गारपिटीत ३०० हेक्टर रबी उद्ध्वस्त
By Admin | Updated: March 16, 2015 01:56 IST2015-03-16T01:56:43+5:302015-03-16T01:56:43+5:30
तालुक्यातील माळपठार भागात शुक्रवारी रात्री झालेल्या गारपिटीत ३०० हेक्टरवरील रबी पीक उद्ध्वस्त झाले.

गारपिटीत ३०० हेक्टर रबी उद्ध्वस्त
पुसद/बेलोरा : तालुक्यातील माळपठार भागात शुक्रवारी रात्री झालेल्या गारपिटीत ३०० हेक्टरवरील रबी पीक उद्ध्वस्त झाले. गहू, हरभरा, मोहरी, कांदा, केळी, भूईमुगाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे आणि जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक यांनी केली.
पुसद तालुक्यातील मोप, शिवणी, आमटी, होरकड, पिंपळगाव, नानंद, जवळा, जामनाईक आदी गावातील शेतकरी इसापूर धरणाच्या बॅक वॉटरवर सिंचन करून रबीचा हंगाम घेतात. मात्र शुक्रवार १३ मार्चच्या रात्री वादळी पावसासह गारपिट झाली. माळपठारावर लिंबाच्या आकाराच्या गारा बरसल्या. त्यामुळे तब्बल ३०० हेक्टरवरील पीक भूईसपाट झाले. मोप येथील ज्योतीराम मानवरकर यांचे कांदा पीक, संजय मस्के, नामदेव खरात, राजेंद्र मस्के, अशोक गौर यांचे केळी पीक, पंडित मस्के, राजू पोले, विजय मस्के, कैलास मस्के, पांडुरंग मस्के, चंपत खरात, शंकर खरात यांच्या शेतातील गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, जिल्हा परिषद सदस्य ययाती नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, सुभाष कांबळे, विवेक मस्के, बी.जी. राठोड, नायब तहसीलदार देवानंद ढबाले, ग्रामसेवक एस.के. जाधव आदींनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उद्ध्वस्त पीक दाखविले. अनेक शेतकऱ्यांनी तर हातात गारा घेऊन दाहकता मांडली. (प्रतिनिधी)