बिबट शिकारीत स्थानिक तस्कर निशाण्यावर

By Admin | Updated: March 10, 2017 01:11 IST2017-03-10T01:11:59+5:302017-03-10T01:11:59+5:30

शहरालगतच्या टाकळी शिवारात मादी बिबटावर विष प्रयोग करून शिकार करण्यात आली.

In a hunter-hitting shootout a local smuggler | बिबट शिकारीत स्थानिक तस्कर निशाण्यावर

बिबट शिकारीत स्थानिक तस्कर निशाण्यावर

पोलिसांची मदत घेणार : विष प्रयोगानंतर नखे, दात, शेपटी गायब
यवतमाळ : शहरालगतच्या टाकळी शिवारात मादी बिबटावर विष प्रयोग करून शिकार करण्यात आली. यात वन विभागाने तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले असून वन विभागाने यवतमाळातील तस्करांवर तपास केंद्रीत केला आहे.
ज्या पद्धतीने विष प्रयोग करून बिबटाचे अवयव काढण्यात आले, यावरून सराईत शिकार करणारी टोळीच हे करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील नागपूर बायपासवरील एका फैलातून मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होते. त्यांच्याकडूनच वन्यजीवांची शिकारही केली जाते. शहरालगतच्या पाच किलोमीटर परिसरातील बहुतांश जंगल या तस्करांनी साफ केले आहे. बिबट शिकार प्रकरणात येथीलच तस्करांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी शिंदेनगर परिसरात पोलीस धाडीतून काळविटाचे मांस विक्री होत असल्याचे उघड झाले होते. त्यावेळीसुद्धा आरोपीच्या घरी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे दात, नखे, कातडे सापडले होते. याच टोळीतील सय्यद अयुब सय्यद युसुफ हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा बिबट शिकार प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता हेरून तपास केला जात आहे. घटनेनंतर काही तासातच तीन संशयितांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात टाकळी येथील रामदास बांगर, मोहन बांगर व आणखी एकाची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांचा शिकारीत सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. गुरूवारी टाकळीतील चार जणांचे याच अनुषंगाने बयाण नोंदविण्यात आले.
लाकूड तस्करीसाठी टाकळी परिसरातील वन विकास महामंडळाच्या जंगलात रात्री या तस्करांचा वावर असतो. मादी बिबटाची शिकार केल्याचे निदर्शनास आल्यावर विष टाकण्यात आले. नंतर त्या शिकारीवर लक्ष ठेऊन बिबटाचा पाठलाग करण्यात आला. विष प्रयोगामुळे बिबटाचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी (शरीरातील रक्त गोठल्यानंतर) त्याच्या चारही पायांचे पंजे, शेपटीचा गोंडा, दात, मिशा उपटून काढण्यात आल्या. हे सर्व अवयव बाजारपेठेत अतिशय मोठ्या किमतीत विकले जातात. यातूनच बिबट्याची शिकार झाल्याचे दिसून येते.
मादी बिबटाचा मृतदेह अशोक रेड्डी यांच्या शेतशिवारात बुधवारी सकाळी आढळला. त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. इतकेच नव्हे तर पोलिसांचे श्वान पथकही पाचारण केले. मात्र या मादी बिबटाचा तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. रात्री ११.३० वाजता मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. गुरूवारी सकाळी या मादी बिबटाच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करण्यात आले. शिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून पोलिसांची मदत घेण्यात येत असल्याचे सहायक वनसंरक्षक गिरजा देसाई यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: In a hunter-hitting shootout a local smuggler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.