लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: August 16, 2014 23:44 IST2014-08-16T23:44:17+5:302014-08-16T23:44:17+5:30
जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून

लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी
अन्नपूर्णा योजना : गेल्या सहा महिन्यांपासून योजनेत धान्याचा तुटवडा
महागाव : जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून धान्यच मिळाले नाही. काही तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र धान्याचा काळा बाजार होत असून शासनाने नेमून दिलेल्या अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांचे मात्र धान्याच्या प्रतीक्षेत अवसान गळून गेले आहे.
अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी वृद्ध असून निराधार म्हणून गणले जातात. अशा निराधारांना चार ते सहा महिन्यांपासून धान्यच मिळाले नसल्याने त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. एकट्या महागाव तहसील कार्यालयात २६१ लाभार्थी फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेंतर्गत धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हास्तरावरून अन्नपूर्णा योजनेंतर्गत कोणत्याच प्रकारचे धान्य मिळाले नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागात यासंदर्भात विचारणा केली असता जिल्ह्याला चार हजार ६९२ एवढ्या लाभार्थ्यांचे या योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले असून यातील काही लाभार्थी मरण पावले आहेत तर काही लाभार्थी अंत्योदय योजनेत वर्ग करण्यात आले आहेत. डाटा एन्ट्रीचे काम सुरू असल्याने नेमका यातील मयत आणि अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी किती हे आताच सांगता येणार नाही. सदर काम पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भातील आकडेवारी सांगण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये म्हणून दर महिन्याच्या पाच तारखेला किंवा मागे-पुढे होणाऱ्या जिल्हा पुरवठा विभागाच्या बैठकीत इतर योजनेतील धान्य अन्नपूर्णा योजनेत वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, अशी माहिती पुरवठा विभागात कार्यरत चांदोरे यांनी दिली. त्यामुळे अशा योजनेतील लाभार्थ्याला धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही. सध्या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ मोफत दिले जाते. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लाभार्थी संख्या पाहता प्रत्येक महिन्याला १०० क्विंटल गहू आणि तेवढाच तांदूळ गेल्या सहा महिन्यांपासून वाटप होणे बाकी आहे. याबाबत वारंवार नागरिकांकडून संबंधित विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु त्यांना मात्र समाधानकारक असे उत्तर मिळत नाही.
प्रत्येक महिन्याला अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्याला लागणाऱ्या धान्याची मागणी प्रत्येक तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा विभागाला पाठविणे अपेक्षित असते. त्यांच्याकडून ही मागणी केली जात असून प्रत्यक्ष धान्यच उपलब्ध नाही, अशी ओरड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासनाच्या पाठशिवणीच्या खेळात अन्नपूर्णा योजनेतील निराधार वृद्ध मात्र शेवटच्या घटका मोजत असून त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून निराधार वृद्धांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हाभरातील अन्नपूर्णाच्या लाभार्थ्यांकडून होत आहे.
(शहर प्रतिनिधी)