पैनगंगा नदी पात्रात शेकडो वाहनांचा डेरा

By Admin | Updated: February 4, 2016 02:34 IST2016-02-04T02:34:50+5:302016-02-04T02:34:50+5:30

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटांवर दररोज शेकडो वाहनांचा डेरा असतो.

Hundreds of vehicles in the Penganga River Plate | पैनगंगा नदी पात्रात शेकडो वाहनांचा डेरा

पैनगंगा नदी पात्रात शेकडो वाहनांचा डेरा

उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटांवर दररोज शेकडो वाहनांचा डेरा असतो. मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून यात सर्वाधिक धुमाकूळ मराठवाड्यातील तस्करांचा आहे. विदर्भातील पथक पकडायला गेले तर मराठवाड्यात धाव घ्यायची आणि मराठवाड्यातील पथक आले तर विदर्भात धाव असा पाठशिवणीचा खेळ तस्कर महसूल प्रशासनाशी खेळत आहे.
उमरखेड तालुक्याच्या सिमेवरून पैनगंगा नदी वाहते. यंदा ही नदी हिवाळ्यातच कोरडी पडल्याने रेती तस्करांसाठी रान मोकळे झाले आहे. तालुक्यातील निवडक दोनच घाटाचे लिलाव झाले आहे. त्यात पळशी आणि बोरी या दोन घाटांचा समावेश आहे. उर्वरित घाटांचा लिलाव पर्यावरणाच्या परवानगीसाठी रखडला आहे. परंतु या घाटांवर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. ट्रक-ट्रॅक्टरमधून रेतीची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे सीमेपलिकडील मराठवाड्यातील तस्करांचा सर्वाधिक धुमाकूळ येथे पहावयास मिळतो. जेसीबी मशीनद्वारे रेतीचे उत्खनन केले जाते. यामुळे नदी पात्रात मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहे. त्यामुळे पैनगंगेचा अंतर्गत प्रवाह बाधित होण्याची शक्यता आहे. तसेच वाहन थेट नदीत उतरविण्यासाठी पैनगंगेची नैसर्गिक संरक्षक भिंत असलेली थडीही खचविली जात आहे. यामुळे पावसाळ्यात खचलेल्या थडीतून पुराचे पाणी शेतात आणि गावात शिरण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार खुलेआमपणे सुरू आहे. महसूल विभागाने पथक तयार केले आहे. परंतु या पथकाला गुंगारा देण्यात तस्कर मंडळी वस्ताद झाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of vehicles in the Penganga River Plate