भारतीनगरात १३ लाखांची घरफोडी
By Admin | Updated: January 25, 2015 23:28 IST2015-01-25T23:28:22+5:302015-01-25T23:28:22+5:30
येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला.

भारतीनगरात १३ लाखांची घरफोडी
यवतमाळ : येथील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीनगरातील बंद घर फोडून चोरट्याने १२ लाखांची रोख व सोन्याचे दागिने असा सुमारे १३ लाखांचा ऐवज लंपास केला. दाराचा कोंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. मध्यरात्रीच्या सुमारास घरमालक बाहेरगाववरून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला.
दारव्हा मार्गावरील भारतीनगरात उमेश शालीग्राम जयस्वाल यांचे प्रशस्त घर आहे. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते सहपरिवार पुतण्याच्या साक्षगंधासाठी हिंगोली येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री २ वाजताच्या सुमारास घरी परताच त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कुठल्याही वस्तूला हात न लावता पाहणी केली. त्यामध्ये कपाटातील रोख आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान बंद कुलूप घराच्या मागे पडून असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान रविवारी सकाळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. चोरट्यांनी घटनास्थळी कुठलाच पुरावा सोडला नाही. त्यामुळे श्वान चोरट्यांचा माग घेण्यात अपयशी ठरले. कपाटावर बोटांचे काही ठसे आढळून आले. ठसे तज्ज्ञांनी ते प्रिंट करून तपासणीसाठी नेले. मात्र कुटुंबातीलच व्यक्तीचे हे ठसे असावे असा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर चोरट्यांना हुडकून काढण्यासाठी परिसरातील घरांच्या बाहेर लावून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजचा आधार घेण्यात आला. परिसरातील दोन घरांवर असलेले सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले.
उमेश जयस्वाल यांचे मद्यविक्री बरोबरच अनेक व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवसायातून आलेली रोकड नेहमीच ठेवलेली असते. साक्षगंधाच्या धामधुमीत ही रोकड बँकेत टाकणे शक्य झाले नाही. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावले. (स्थानिक प्रतिनिधी)