शेकडो एकरातील रबीचे पीक धोक्यात
By Admin | Updated: November 27, 2015 02:41 IST2015-11-27T02:41:21+5:302015-11-27T02:41:21+5:30
म्हसणी धरणाच्या कालव्याचे पाणी ऐन वेळेवर बंद करण्यात आल्याने चिखली (रामनाथ)पासून पुढील पाच गावातील शेकडो एकर रबीचे पीक धोक्यात आले आहे.

शेकडो एकरातील रबीचे पीक धोक्यात
शेतकरी संतप्त : कालव्याचे पाणी अचानक बंद केल्याने फटका
दारव्हा : म्हसणी धरणाच्या कालव्याचे पाणी ऐन वेळेवर बंद करण्यात आल्याने चिखली (रामनाथ)पासून पुढील पाच गावातील शेकडो एकर रबीचे पीक धोक्यात आले आहे. या कालव्यातील पाण्याच्या भरवशावर या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी पिकाची लागवड केली आहे. परंतु पाण्याचा खंड पडल्याने पिकांना बसणाऱ्या फटक्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहे.
या कालव्याला चिखलीजवळ पडलेल्या भगदाडाची वेळीच दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रबीकरिता पाणी सोडण्यात आल्यानंतर ते पाणी गावातील तांडावस्तीत शिरुन रहिवाशांचे नुकसान झाले. आता पाणी बंद करण्यात आल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून म्हसणी धरणाचा कालवा चिखलीजवळ पाझरत असल्याची तक्रार आहे. या पाझरामुळे दरवर्षी चिखलीतील तांडावस्तीचे नुकसान होत होते तरीसुद्धा मध्यंतरी याकडे दुर्लक्ष झाले. शेवटी तक्रारी वाढल्यानंतर कालव्याच्या दुरूस्तीच्या कामाची निविदा काढून कंत्राट देण्यात आला. परंतु संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट ठेवले. त्यानंतर अशाच अवस्थेत अधिकाऱ्यांनी रबी हंगामाकरिता धरणाचे पाणी सोडले, पाणी गावाजवळ पोहचताच कालव्याला मोठे भगदाड पडले व त्यातून पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात पाणी वाहू लागले.
कालवा करून गावाची सुरक्षितता धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली. हा विषय ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चिखलीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत कालव्याच्या दुरूस्तीचे निर्देश दिले. तेव्हा अधिकाऱ्यांनी पाणी बंद करून कालव्याचे भगदाड बुजविण्यासाठी धावपळ सुरू केली. ताडपत्री व मातीव्दारे दुरूस्तीचे तात्पुरत्या स्वरुपाचे काम करण्यात आले.
परंतु तरीसुद्धा भगदाड बंद झाले नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद ठेवणे हा एकच पर्याय असल्याने तसा निर्णय घेण्यात आला, पण इकडे पाणी बंद झाल्याने या पाण्याच्या भरवशावर रबी पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र संकट कोसळले. चिखलीसह भांडेगाव, माणकी, कोलवाई व तळेगाव या पाच गावातील धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी दरवर्षी कालव्याचे पाणी मिळत असल्याने त्या आशेवर शेकडो एकर क्षेत्रात गहू, हरभरा या रबी पिकाची लागवड केली आहे. या पिकाला पाण्याची गरज असताना कालव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे.
मंगळवारी चारही गावाचे सरपंच व नागरिक चिखलीला गोळा झाले. त्यांनी कालव्याची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्वरित कालव्याव्दारे पाणी सोडण्याची मागणी केली. पाणी न सोडल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नुकसानीला जबाबदार कोण ?
कालव्याला पाझर फुटला, भगदाड पडले त्यामुळे चिखलीतील तांडा वस्तीत राहणाऱ्या लोकांचे नुकसान झाले. त्यांना त्रास सहन करावा लागला तर आता कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्याने पाच गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार याची चौकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी वेळीच यात लक्ष घालून कालव्याची दुरूस्ती करून घेतली असती तर दोन्ही बाजुकडील लोकांवर ही पाळी आली नसती. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे.