पुसद तहसीलवर धडकले शेकडो शेतकरी
By Admin | Updated: October 29, 2014 22:57 IST2014-10-29T22:57:10+5:302014-10-29T22:57:10+5:30
निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले.

पुसद तहसीलवर धडकले शेकडो शेतकरी
पुसद : निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले.
शेतकऱ्यांनी आजवर अनेक संकटे झेलली. परंतु यंदाचे संकट भीषण आहे. ३० किलो सोयाबीन बियाण्यातून केवळ ५० किलो उत्पन्न येत आहे. यापेक्षा मजुरांची मजुरीच जास्त होत आहे. अपुऱ्या पावसाने कपाशीचे पीकही उद्ध्वस्त झाले आहे. एकरी दहा ते २० हजार खर्च करून हाती काहीच येत नाही. यंदा लागवडीचा खर्चही निघणे अशक्य आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून संपूर्ण पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत तालुक्यातील वेणी, खडकदरी, दहीवड, कोंढई, पाळूवाडी, आसोली, पोखरी या गावातील सुमारे ५०० वर शेतकरी बुधवारी पुसद तहसीलवर धडकले. पुसद तालुका दुष्काळग्रस्त करावा या मागणीसह मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नियमित वीज पुरवठा करावा, रबी हंगामासाठी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उत्तमराव खंदारे, प्रेमराव मस्के, प्रवीण दुद्दल, सूर्यभान टारफे, संजय भोने, माधवराव सुरोशे, गोविंदराव मस्के, नारायण महाराज यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)