अन्न सुरक्षा योजनेपासून शेकडो लाभार्थी वंचित
By Admin | Updated: September 28, 2015 02:49 IST2015-09-28T02:49:10+5:302015-09-28T02:49:10+5:30
गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली.

अन्न सुरक्षा योजनेपासून शेकडो लाभार्थी वंचित
राजाभाऊ बेदरकर उमरखेड
गोरगरीब अन्न धान्याअभावी अर्धपोटी राहू नये म्हणून शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र उमरखेड तालुक्यातील शेकडो कुटुंब आजही या योजनेपासून वंचित असल्याचे दिसत आहे. केवळ १३ हजार ७७३ कुटुंबांचाच या योजनेत समावेश झाल्याचे दिसत आहे.
अन्न सुरक्षा योजनेचा भरपूर गाजावाजा करण्यात आला. ही योजना खरोखरच गोरगरिबांसाठी राबविली जात काय याची आवश्यकता पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची मारामार आहे असे कित्येक कुटुंब या योजनेपासून दूर फेकल्या गेली आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना सुरू होऊन वर्ष झाले तरी अशा कित्येक गरजू कुटुंबांना अद्यापही या योजनेत सहभागी करून घेतले नाही. सुख वस्तू कुटुंबांना सदर योजनेत घिसाड घाईने आणि वशिलेबाजीने समावेश करण्यात आल्याने गरजूंच्या तोंडचा घास हिरावला गेल्याचे वास्तव समोर येत आहे. तालुकास्तरावरील या योजनेचा उद्दिष्टांकदेखील पूर्ण झाल्याची शासकीय स्तरातून घोषणा करण्यात आली. उद्दिष्टांक पूर्ण झाला आहे. आता नव्याने प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागेल या सबबी सांगून या योजनेचा मुळातच गाभा असलेल्या गरजवंतांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पिटाळल्या जात आहे.
तालुक्यात केवळ १३ हजार ७७३ कुटुंबच अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. आजही शेकडो कुटुंब या योजनेपासून वंचित आहे. या योजनेला देखील शिधा पत्रिका आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही ते ग्रामीण अथवा शहरी मंडळी झोपडीत आपले जीवन कंठीत आहे. त्यांच्याकडे कागदावर दाखविण्यासाठी जागा नाही. त्यामुळे शिधापत्रिका मिळत नाही. शिधापत्रिका नसल्याने या योजनेचा लाभ होत नाही. शिधापत्रिका देण्यासाठी गाव नमुना आठ अ ची अट मारक ठरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रभाविपणे राबविताना ही मोठी अडचण आहे आणि त्यामुळेच या योजनेपासून शेकडो कुटुंब वंचित आहे.