अधिकाऱ्यातील माणुसकीने सावरले कुटुंब

By Admin | Updated: September 9, 2016 02:46 IST2016-09-09T02:46:33+5:302016-09-09T02:46:33+5:30

शासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते.

Humanity in human rights | अधिकाऱ्यातील माणुसकीने सावरले कुटुंब

अधिकाऱ्यातील माणुसकीने सावरले कुटुंब

प्रेरणादायी कार्य : वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला अधिकाऱ्याने घेतले दत्तक
गजानन अक्कलवार कळंब
शासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते. अनेक अधिकारी आपले कर्तव्य नीट बजावतातही. परंतु सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावात्मक कार्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे अधिकारी बोटावर मोजण्या इतकेच उरले आहेत. त्यामध्ये कळंब येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असणारे मनोहर शहारे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या शासनबाह्य कार्याला सामाजिक बांधिलकीची किनार ही असतेच. दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलांना दत्तक घेत त्यांनी पुन्हा एकदा त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली.
राळेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील खैरगाव (कासार) येथील आदिवासी शेतकरी मारोती विठोबा नागोसे यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचे संपूर्ण कुंटुब उघड्यावर पडले. एकीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दुसरीकडे अशाप्रकारे होणारे आघात त्यामुळे देशाच्या पोशिंद्यावरच आलेल्या संकटाची धग कमी करण्यासाठी काही चांगुलपणा जिवंत असणाऱ्या लोकांना मनोहर शहारे यांनी एकत्रित केले. त्यांना सोबत घेऊन खैरगाव (कासार) गाव गाठले. दु:खी कुटुंबाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत, आलेल्या संकटाचा जो धैर्याने सामना करतो तोच जीवनात यशस्वी होतो. त्यामुळे आता आपण या दु:खातून सावरले पाहीजे. यासाठी मनोहर शहारे यांनी स्वत: व मित्रमंडळीकडून जमा केलेली आर्थिक मदत ग्रामस्थांसमक्ष मृतक मारोती नागोसे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वाधीन केली. त्यांना आपुलकीच्या भावनेतून धीर दिला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या दोन मुली, एक मुलगा व कुटुंबातील इतर सदस्य उघड्यावर पडले. दोन मुली व शिक्षणाची आवड असलेला मुलगा सुमित उर्फ झोल्या याचे कसे होईल याची काळजी कुटूंबाला होती. ही बाब ओळखत मनोहर शहारे यांनी तत्काळ झोल्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याला नोकरी मिळेपर्यंत संपूर्ण शिक्षणाचा भार उचलण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्यात असलेल्या अधिकाऱ्यातील माणुसकीने दिलेला हा प्रत्यय कोणालाही अभिमान वाटावा असाच होता. ही त्यांची पहिलीच वेळ नाही. अनेकवेळा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय कळंबवासियंना आला आहे. त्यांच्यासारख्या इतर अधिकारी व सक्षम नागरिकांनी दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले पाहीजे. तेंव्हाच कुठे प्रत्येक नागरिकांमध्ये आपुलकी व बंधुभावाचे नाते दृढ होईल.

Web Title: Humanity in human rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.