मांडवीत आठ घरे भस्मसात
By Admin | Updated: May 1, 2015 01:54 IST2015-05-01T01:54:31+5:302015-05-01T01:54:31+5:30
झरीजामणी तालुक्यातील मांडवी (बोरी) येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आठ घरांचा कोळसा झाला.

मांडवीत आठ घरे भस्मसात
ंपाटणबोरी : झरीजामणी तालुक्यातील मांडवी (बोरी) येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत आठ घरांचा कोळसा झाला. या आगीत जनावरेही मृत्यूमुखी पडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा संपूर्ण गाव आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते.
झरीजामणी तालुक्यात मांडवी बोरी हे चिमुकले गाव आहे. सर्व गाव नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अचानक रामचंद्र गोंड्रावार यांच्या घराला आग लागली. काही कळायच्या आत या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र आगीचे रौद्ररुप पाहून त्यांचाही इलाज चालत नव्हता. बघता बघता आठ घरे आणि जनावरांचा गोठा या आगीने भस्मसात केला. रामचंद्र गोंड्रावार यांचे अर्धे घर या आगीत जळाले. तसेच गोठा जळाल्याने व्यालेली गाय जळून कोळसा झाली. एक गोऱ्हा आणि म्हैसही जळाल्याने गंभीर आहे. एका बैलाला आगीच्या झळा पोहोचल्या. घरातील अन्न, धान्य, शेती साहित्य, कपडे जळून भस्मसात झाले. लगतच्या गजानन जल्लावार यांच्या घराला लागलेल्या आगीत शेती साहित्य, घरातील धान्य, कपडे जळून खाक झाले. त्यांचा गोठाही भस्मसात झाला. मोहन कडलवार यांचा गोठा जळाल्याने शेतीपयोगी साहित्य व कडबा कुटार जळाले. हुशन्ना गाजमवार व रवींद्र गाजमवार यांचे घरही आगीत भस्मसात झाले. घरातील अन्न धान्य व कपडा जळाला. मंगला दुधलकर, संतोष दुधलकर, रामदास कडलवार यांचीही घरे या आगीत भस्मसात झाले.
आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. पांढरकवडा येथील अग्नीशमन दलाला सूचना दिली. परंतु अग्नीशमन दल गावात पोहोचलेच नाही. संपूर्ण गाव रस्त्यावर आले. आगीचे उंच लोळ उडताना दिसत होते. पूर्ण गावच आग कवेत घेते की काय अशी स्थिती होती. या स्थितीत गावकऱ्यांनी आठ मोटारपंपाच्या सहाय्याने पाण्याचा मारा केला. श्रीनिवास अडपावार यांच्या शेतातील मोटारीने पाणी आणण्यात आले. अखेर दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळाले. (वार्ताहर)
मांंडवी येथे आग लागल्याची माहिती होताच गुरुवारी सकाळी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी भेट दिली. आगग्रस्तांचे सांत्वन करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तहसीलदारांसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आमदारांनी या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त कुटुंबियांचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. यावेळी सतीश दासरवार, सुरेशरेड्डी कॅतमवार उपस्थित होते.