दवाखान्याची वास्तू जमीनदोस्त
By Admin | Updated: May 8, 2015 00:13 IST2015-05-08T00:13:18+5:302015-05-08T00:13:18+5:30
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची निम्मी वास्तू जमीनदोस्त झाली आहे़ ..

दवाखान्याची वास्तू जमीनदोस्त
वणी : तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची निम्मी वास्तू जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचार करावे लागत आहे.
गेल्या १0 वर्षांपूर्वी या वास्तूची मागील निम्मी भिंत कोसळली होती. परिणामी समोरील एकच खोली रूग्णांच्या उपचारासाठी शिल्लक उरली. आता त्या खोलीलाही अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ती खोली कधी, कुणावर कोसळेल याचा नेम उरला नाही. तेथे कार्यरत डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर उपचार करावे लागत आहे़
या दवाखान्यातील परिचराचे पदही गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. परिणामी दवाखान्याचा पूर्ण भार तेथे कार्यरत एकमेव डॉक्टरांवरच आहे. त्याचा त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जीर्ण वास्तूत रूग्णांवर उपचार करण्यासाठी जागा नसल्याने बाजूलाच असलेल्या ग्रामपंचायतीच्या वऱ्हांड्यात खाटा ठेवून तेथे अनेकदा रूग्णांवर उपचार केले जात आहे. या जीर्ण वास्तूबाबत दवाखान्यातील यापूर्वीच्या प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे माहिती दिली. मात्र त्यांच्या माहितीची आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही़ दवाखान्यात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहे. मात्र वास्तूच खचलेली आहे़ या वास्तूवरील कवेलू फुटल्यामुळे पावसाळ्यात दवाखान्यात तळे साचते़ चक्क दवाखान्याचेच आरोग्य धोक्यात सापडते़ जुन्या वास्तूचे बांधकामही निकृष्ट असल्याने कार्यरत आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्पुरती डागडुजी करवून घेतली आहे. मात्र तरीही वरिष्ठ लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)