रुग्णालय तोडफोडप्रकरणी मोर्चा

By Admin | Updated: October 20, 2015 03:15 IST2015-10-20T03:15:14+5:302015-10-20T03:15:14+5:30

येथील महादेव मंदिर मार्गावरील बरलोटा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रविवारी सकाळी तोडफोड

Hospital Settlement Front | रुग्णालय तोडफोडप्रकरणी मोर्चा

रुग्णालय तोडफोडप्रकरणी मोर्चा

यवतमाळ : येथील महादेव मंदिर मार्गावरील बरलोटा हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रविवारी सकाळी तोडफोड केली. या घटनेचा निषेध म्हणून आयएमए (इंडीयन मेडिकल असोसिएशन) शाखा यवतमाळच्या वतीने चोवीस तास आपली रुग्णालये बंद ठेवून सोमवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजा कडूकार व सचिव डॉ. नीलेश येलनारे यांच्या नेतृत्वात निषेध मूक मोर्चा बरलोटा हॉस्पिटल पासून काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या हातात निषेध फलक होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर डॉक्टर मंडळींनी ठिय्या दिला. यावेळी हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची बाजू ऐकूण घेतली.
नंतर ही सगळी डॉक्टर मंडळी विश्राम गृह येथे पोहचली. तिथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. दिलीप देशमुख, डॉ. राजेंद्र कडूकार, डॉ. सुदर्शन कांबळे, डॉ.टी.सी. राठोड, डॉ.सुनील अग्रवाल, डॉ. सुरेखा ठाकरे, डॉ.अशोक चौधरी यांच्यासह शहरातील २४० डॉक्टर उपस्थित होते.
या घटनेच्या निषेधार्थ शहरातील ४० खासगी रुग्णालये आज सकाळी आठ वाजतापासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागले, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये या दरम्यान गर्दी वाढली होती.
दरम्यान याच प्रकरणात श्रमिक पत्रकार संघानेही विवेक गावंडे यांना बरलोटा हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांना निवेदन दिले. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या प्रकरणात पोलीस एकतर्फी कारवाई करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन सादर करण्यात आले. घटनेचा वृत्तांत पत्रकारांनी अधिकाऱ्यांपुढे मांडला. रुग्णालयाने सादर केलेले सीसीटीव्हीचे फुटेज दिशाभूल करणारे असून पत्रकारांकडचेही फुटेज तपासण्याची विनंती करण्यात आली. सबंधित महिला डॉक्टरवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी फुटेजच्या तपासणीनंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नागेश गोरख, सचिव निलेश फाळके, अनिरुद्ध पांडे, दिनेश चोरडिया, गणेश बयस, श्रीकांत राऊत, आनंद कसंबे, कपिल शामकुवर, अमोल शिंदे, नितीन भागवते, संदीप खडेकर, गणेश खडसे, प्रवीण देशमुख, मनोज बावनथडे, दीपक शास्त्री, सतीश येटरे, मयूर वानखडे, धनंजय खारोकर, सूरज पाटील, केशव सवळकर, पवन लताड, मनीष जामदळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

पालकमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले
४विश्रामगृह येथे पत्रकार व डॉक्टर यांचे प्रतिनिधी मंडळ समोरासमोर चर्चेसाठी बोलाविण्यात आले होते. या चर्चेदरम्यान पत्रकारांनी व्हिडिओ क्लिप्स् पालकमंत्र्यांना दाखविली. यावेळी या फुटेजमध्ये पत्रकार मारहाण करताना दिसले नाही. यामुळे पालकमंत्र्यांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारला. या प्रकरणात डॉक्टरांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस अधिक्षकांना सुधारित पत्र देण्याचे आश्वासन दिले. मारहाणीमध्ये पत्रकार सहभागी नसल्याचे पत्र डॉक्टर पोलिसांना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Hospital Settlement Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.