कथित अपहरणाच्या वार्तेची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 02:40 IST2015-08-26T02:40:09+5:302015-08-26T02:40:09+5:30

चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे.

The horrors of the alleged kidnapping | कथित अपहरणाच्या वार्तेची दहशत

कथित अपहरणाच्या वार्तेची दहशत

पालक भयभीत : विद्यार्थ्यांमध्ये दहशत, पोलिसांची संपूर्ण जिल्हाभर नाकेबंदी
पांढरकवडा : चार लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या कथीत वार्तेची शहरात अद्यापही दहशत कायम आहे. दरम्यान कोणत्याही मुलाचे शहरातून अपहरण झाले नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार गुलाब वाघ यांनी केले आहे़
सोमवारी येथील गजानन महाराज मंदिर परिसरातून मारोती व्हॅनमध्ये चार लहान मुलांना जबरदस्तीने टाकून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या पृथ्वी आकाश वल्लभवार या १४ वर्षीय विद्यार्थ्याने शेजारच्या लोकांना सांगितले होती. त्यावरून प्रदीप राशतवार व शेजारच्या काहींनी क्षणाचाही विलंब न करता तडकाफडकी पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान ही वार्ता शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली़ त्यामुळे पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली़ विशेष म्हणजे ज्या पृथ्वी या विद्यार्थ्याने ही घटना पोलिसांना सांगितली, त्याने कोणत्या वाहनात मुलांना नेले, त्या वाहनाचा क्रमांकही पोलिसांना सांगितला़. एम़एच़३१-क्यू.५४७४ क्रमांकाच्या मारोती व्हॅनमध्ये जबरीने मुलांना बसवून नेल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने वेगाने तपासाला सुरूवात केली़ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, टोल नाक्यावर या क्रमांकाच्या वाहनाबाबत माहिती देण्यात आली़ सोमवारी सकाळी ९ वाजतापासून संपूर्ण शहरात कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती. सोमवारी कृषी भवनमध्ये खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची मतमोजनणी होती़ यानिमित्ताने परिसरातील तसेच खेड्यापाड्यातील लोकांनी गर्दी केली होती़ मात्र त्याही ठिकाणी कथीत अपहरणाचीच चर्चा सुरू होती़ पोलिसांनी शहरातील सर्व शाळेत जाऊन याबाबत माहिती दिली़ मात्र तरीही दिवसभर शहरवासीयांवर भितीचे सावट पसरले होते़
अनेक पालकांनी आपली मुले शाळेत आहे, की नाही याची खात्री करून घेतली़ तथापि अद्यापही आपला मुलगा घरी आला नाही, अशा प्रकारची तक्रार कुणीही पोलिसांत केली नाही़ मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमुळे एवढी खळबळ उडाली, तो पृथ्वी पोलिसांना दिलेल्या माहितीवर ठाम आहे़ स्वत: माझ्या डोळ्याने मी हा प्रकार पाहिल्याचे तो सांगत आहे. या प्रकाराबाबत शहरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे़ दरम्यान, हा अफवा पसरविण्याचा तर प्रकार नाही ना, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहे. या अपवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The horrors of the alleged kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.