दोन दशकातील गुंडांची ‘कुंडली’ तयार

By Admin | Updated: September 7, 2014 00:10 IST2014-09-07T00:10:37+5:302014-09-07T00:10:37+5:30

पोलीस दफ्तरी गंभीर गुन्हे शिरावर नोंद असलेल्या दोन दशकातील गुंडांची कुंडली तयार केली जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीच्या प्रस्तावापाठोपाठ आता या गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे.

The 'horoscope' of two-decade goons was ready | दोन दशकातील गुंडांची ‘कुंडली’ तयार

दोन दशकातील गुंडांची ‘कुंडली’ तयार

सतीश येटरे - यवतमाळ
पोलीस दफ्तरी गंभीर गुन्हे शिरावर नोंद असलेल्या दोन दशकातील गुंडांची कुंडली तयार केली जात आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीच्या प्रस्तावापाठोपाठ आता या गुंडांवर एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नव्हे तर भल्या भल्या दादांची पाचावर धार बसली असून अनेकांनी गाव सोडण्याची तयारी चालविली आहे.
सर्वसामान्यांना वेठीस धरून दादागिरीच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुंडांची जिल्ह्यात संख्या मोठी आहे. तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दिवसेंदिवस शरीर दुखापतीच्या आणि संपत्तीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेत आणि आगामी विधानसभा व दुर्गाेत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी येथे रूजू होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून गुंड आणि उपद्रव मुल्य जास्त असलेल्यांवर ११० कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा चालविला. त्यानंतर त्यांच्यातीलच २५ निवडक आणि सराईत गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार केले. तडीपारीचे प्रस्ताव तयार केलेल्या २५ टॉप गुंडांमधून किमान दहा जणांवर मोक्का-एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने १९९० पासूनचे गुन्ह्यांचे रेकॉर्ड काढले आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्या गुंडावर दाखल गुन्हे, न्यायप्रविष्ट खटले, खटल्यात निर्दाेष अथवा झालेली शिक्षा, पसार कालावधीत आश्रयस्थाने, हितचिंतक, शत्रू, जामीन घेणाऱ्या व्यक्ती, कुटुंबाची इत्यंभूत माहिती, व्यसन, छायाचित्र अशी कुंडलीच (डोजर) तयार केल्या गेली आहे. स्थानिक स्तरावर एमपीडीएचे तयार झालेले प्रस्ताव त्रुटीत निघून वरिष्ठ स्तराहून नाकारल्या जावू नये, यासाठी एमपीडीएच्या प्रस्ताव तयार करण्यात तज्ञ असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. तडीपारीचे प्रस्ताव व एमपीडीए करण्यासाठी माहिती गोळा केली जात असल्याची कुणकुण लागल्याने गुन्हेगारी वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

Web Title: The 'horoscope' of two-decade goons was ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.