सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान
By Admin | Updated: October 23, 2016 01:59 IST2016-10-23T01:59:05+5:302016-10-23T01:59:05+5:30
आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान लोकमत सखी मंच

सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान
सखी सन्मान सोहळा : रवींद्र व स्मीता कोल्हे, रजिया सुलताना आणि आरती फुपाटे यांच्या हस्ते आज गौरव, कार्यक्रम स्त्री-पुरुष सर्वांसाठी खुला
यवतमाळ : आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या, सामान्य ते असामान्य असा प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान लोकमत सखी मंच रविवार २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित एका शानदार सोहळ्यात करीत आहे.
या सेवाव्रतींचा सत्कार मेळघाटात आंतरिक तळमळीतून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मीता कोल्हे, महिला अत्याचार व समस्यांविरुद्ध लढणाऱ्या अमरावतीच्या रजिया सुलताना आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रासाठी लता प्रल्हाद उपलेंचवार, शौर्य - शिरीन तब्बसूम, क्रीडा - श्रद्धा राजू मुंधडा, आरोग्य वनिता किशोर भोरे, शैक्षणिक - अनिता दामोधर वऱ्हाडे, व्यावसायिक-औद्योगिक - रेणुका माधव राऊत, सांस्कृतिक-साहित्यिक - आशा भालचंद्र काळे आणि जीवनगौरव पुरस्काराने आर्णी येथील डॉ. कुमुदिनी नाफडे यांचा गौरव केला जाणार आहे. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी राहणार असून वणी, कळंब आणि यवतमाळ येथील प्रतिथयश कलावंत आपली कला सादर करणार आहे. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील स्त्री-पुरुष सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सखी मंचच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
सांस्कृतिक कार्यक्रम
पुरस्कार वितरण सोहळ्यात विदर्भातील प्रतिथयश कलावंत आपली कला सादर करणार आहे. वणी येथील प्रसिद्ध नृत्यकार पवन पंधरे, रागिनी गोडे, कळंब येथील वैष्णवी साखरकर, यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीचे मयुरी धवणे, गुंजन दारव्हटकर, नचिकेत गडपायले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जीवनगौरव : कुमुदिनी नाफडे
आर्णी तालुक्याच्या ग्रामीण भागात गत ४० वर्षांपासून डॉ.कुमुदिनी दामोधर नाफडे अविरत आरोग्य सेवा देत आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील माहेर असलेल्या कुमुदिनी यांचा आर्णी येथील डॉ.दामोधर नाफडे यांच्यासोबत १९६० मध्ये विवाह झाला. सासरे विश्वनाथ आणि पती दामोधर यांच्या प्रोत्साहानाने लग्नानंतर अकोला येथून बीएएमएसची ही वैद्यकीय क्षेत्राची पदवी घेतली. लग्नानंतर आर्णी तालुक्यातील लोणी या लहानशा गावी राहून १५ वर्ष वैद्यकीय सेवा दिली. ग्रामीण भागातील महिलांची हलाखीची स्थिती पाहून त्यांनी नाममात्र दरात उपचार सुरू केले.१९९२ मध्ये त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. परंतु कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करीत त्यांनी गोरगरिबांच्या आरोग्यासाठी लढा चालूच ठेवला. आज त्या ७६ वर्षाच्या असल्या तरी आरोग्य सेवेत मात्र कुठेही खंड पडला नाही. मुलगा ललित हा शिक्षण शास्त्रात पीएचडी असून जवळा येथे प्राध्यापक आहे. चार मुली असून दोन मुली पदव्युत्तर, एक मुलगी पदवीधर आणि एक अभियंता आहे. या आरोग्य दुताचा लोकमत सखी मंच जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवान्वित करणार आहे.