नगरपरिषद क्षेत्रातील घरकूल योजना फसली
By Admin | Updated: May 1, 2015 01:57 IST2015-05-01T01:57:16+5:302015-05-01T01:57:16+5:30
जिल्ह्यात दहाही नगरपरिषद क्षेत्रात महत्वाकांक्षी रमाई घरकूल योजना फसल्याचे ...

नगरपरिषद क्षेत्रातील घरकूल योजना फसली
यवतमाळ : जिल्ह्यात दहाही नगरपरिषद क्षेत्रात महत्वाकांक्षी रमाई घरकूल योजना फसल्याचे दिसत असून गत पाच वर्षांपासून या योजनेतील २५ कोटी रुपयांचा निधी खर्चच झाला नसल्याचे पुढे आले आहे. या योजनेतून जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात एक हजार ६९६ घरकूल उभारले जाणार होते. मात्र नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे दारिद्र्य रेषेखालील दलित कुटुंबांना आजही उघड्यावर रहावे लागत आहे.
समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. २०१० मध्ये अस्तित्वात आलेल्या या योजनेसाठी तब्बल २५ कोटी दोन लाख ५९ हजारांचा निधी नगरपरिषदांना देण्यात आला. त्या उपरही नगरपालिकांनी ही योजना प्रभावीपणे राबविलीच नाही. पाच वर्षांचा कालावधी लोटूनही निधी अद्यापही अखर्चित आहे. एक हजार ६९६ घरकुलापैकी केवळ ५९६ लाभार्थी निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदांच्या उदासीन धोरणामुळेच या योजनेचे अनुदान कमी कमी होत गेले. २०१०-११ मध्ये तीन कोटी ७२ लाख, २०११-१२ मध्ये २१ कोटी पाच लाख असे अनुदान मिळाले. त्यानंतर मात्र २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकही रुपया मिळाला नाही. सुरुवातीला मिळालेल्या रकमेपैकी केवळ दहा कोटी ७२ लाख ६१ हजार रुपये खर्च झाले. उर्वरित १५ कोटी रुपये अद्यापही अखर्चित आहे. याचा परिणाम रमाई आवास योजनेच्या अनुदानावर झाला आहे. जिल्ह्यासाठी असलेली ही महत्वाकांक्षी योजना आता फसल्याचे दिसत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)