लोकवाहिनीच्या हिताला अधिकाऱ्यांकडूनच बाधा
By Admin | Updated: March 8, 2016 02:41 IST2016-03-08T02:41:56+5:302016-03-08T02:41:56+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील अधिकाऱ्यांकडून एसटीच्या हिताला बाधा

लोकवाहिनीच्या हिताला अधिकाऱ्यांकडूनच बाधा
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील अधिकाऱ्यांकडून एसटीच्या हिताला बाधा पोहोचत आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होत नाही. उलट आर्थिक नुकसानीच्या बाबींना बळ दिले जात आहे. या प्रकारात काही कर्मचाऱ्यांवर दडपण येत आहे. या बाबी महामंडळातील सेवानिवृत्त कामगार प्रभाकर राख यांनी विभाग नियंत्रकांकडे एक पत्र देऊन मांडल्या आहे. दरम्यान, त्यांनी ८ मार्चपासून विभागीय कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
यवतमाळ आगाराचे तत्कालिन व्यवस्थापक अविनाश राजगुरे यांनी केलेल्या नियमबाह्य कामांची चौकशी करण्यात आलेली नाही. आजही यवतमाळ आगारात जास्त दराचे चालक-वाहक अतिकालिक भत्त्यासाठी वापरले जातात. कमी दराचे चालक-वाहक का वापरले जात नाही, असा प्रश्न करण्यात आला आहे. एसटीच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यवतमाळ विभागात आगार व्यवस्थापकांसाठी शासकीय निवासाची सोय करण्यात आली आहे. परंतु बहुतांश ठिकाणचे व्यवस्थापक शासकीय निवासाचा वापर करत नाही. दररोज अप-डाऊन करतात. त्यांची उपस्थिती आगारात ४-५ तास असते. परिणामी आगारातील कामकाज बाधित झाले आहे. फेऱ्या वेळेवर सुटत नाही, कामगारांच्या गैरहजेरीचे व रजेचे प्रमाण वाढले आहे.
वैयक्तिक कारवाईचे प्रकारही सुरू आहे. दोषारोपपत्र देऊन चौकशीचा ससेमिरा लावला जातो. प्रकरणे कित्येक वर्ष प्रलंबित ठेवून कामगारांवर दडपण वाढविले जाते. कुठल्याही प्रकरणाचा निर्णय सहा महिन्यात द्यावा, अशी तरतूद आहे. परंतु तत्कालिन आणि विद्यमान आगार व्यवस्थापकांकडून या बाबीचे पालन केले जात नाही.
या प्रकाराला नियंत्रणात आणण्याची गरज आहे. त्याशिवाय महामंडळाला चांगले दिवस येणार नाही, असे मत त्यांनी या निवेदनातून व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
बस जळाली, पण कचरा कायम
४यवतमाळ आगारात साचलेला कचरा साफ करावा, अशी विनंती पाच वेळा पत्र देवून तत्कालिन आगार प्रमुख अविनाश राजगुरे यांना केली होती. त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले. अखेर दिवाळीच्या दिवशी दोन बसेस जळाल्या. आगारातील घनकचरा बाहेर पाठविण्याची व्यवस्था केली असती; तर महामंडळाचे नुकसान झाले नसते, असे प्रभाकर राख यांनी काढलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे.