शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

By Admin | Updated: November 18, 2016 02:30 IST2016-11-18T02:30:25+5:302016-11-18T02:30:25+5:30

चलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Higher prices in exchange for old notes in the field | शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

शेतमालाला जुन्या नोटांच्या बदल्यात जास्त भाव

मार्केट बंद : शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा सौदा
गजानन अक्कलवार कळंब
चलनातून पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बाजार समितीचे मार्केंट मागील नऊ तारखेपासून बंद आहे. असे असले तरी खासगीमध्ये जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला जात आहे.
अनेक व्यापाऱ्यांजवळ चलनातून बाद झालेल्या लाखो रुपयांच्या नोटा पडलेल्या आहेत. ही रक्कम हवालाची असल्याचे सांगितले जाते. हा पैसा कुठे खर्ची घालावा याची चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे कुठलाच पैसा नसल्यामुळे त्यांना घर कसे चालवावे, ही समस्या त्यांच्यापुढे उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटलेला आहे. कापूस वेचाई करणेही गरजेचे आहे. त्यामुळे मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. इतर व्यवहारही ठप्प पडले आहे. अशा परिस्थिीतीत शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर दुसरीकडे शेतमाल विकून नवीन चलनातील नोटा देणे कोणालाही शक्य नाही.
त्यामुळे जुन्या नोटा देऊनच व्यवहार केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्या नोटा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्त किंमत दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवहार चुकीचा असला तरी आता शेतकऱ्यांपुढे दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, ही वास्तविकता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जरी फायदा होत असला तरी व्यापाऱ्यांच्याही जुन्या नोटा चलनात येत आहे. हा त्यांच्यासाठी फायदाच म्हणावा लागेल.
येथील बाजार समितीचे अधिकृत मार्केंट मागील एक हप्त्यापासून बंद आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यातून कसा मार्ग काढावा, याचे उत्तर कोणाजवळच नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग भरडला जात आहे. शासनाने अडीच लाखांची मर्यादा आखून दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुन्या नोटांना पसंती देणे सुरु केले आहे.
कळंब शहरातील अनेक बँकांमध्ये पर्याप्त निधीच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या खात्यात पैसे असुनही ते मिळत नाही. सर्वांधिक गोची येथील मध्यवर्ती बँकेत खाते असणाऱ्यांची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे यातून शासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी आहे.
(तालुका प्रतिनिधी)

शेतकऱ्यांना चुकारे कसे मिळणार?
बाजार समितीचे मार्केंट सुरु केल्यास शेतकऱ्यांना चुकारे कसे द्यावे, हा पेच निर्माण झाला आहे. बाजार समिती अ‍ॅक्टनुसार शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत रक्कम देणे बंधनकारक आहे. त्यामुळे धनादेशाने रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात २४ तासाच्या आत रक्कम येणे शक्यच नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.

Web Title: Higher prices in exchange for old notes in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.