दुर्गोत्सवात गर्दीचा उच्चांक
By Admin | Updated: October 19, 2015 00:14 IST2015-10-19T00:14:39+5:302015-10-19T00:14:39+5:30
दुर्गोत्सवातील देखावे डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीने सर्व उच्चांक मोडले आहे.

दुर्गोत्सवात गर्दीचा उच्चांक
पहाटेपर्यंत दर्शन : शहरी व ग्रामीण भाविकांनी रस्ते फुलले
यवतमाळ : दुर्गोत्सवातील देखावे डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीने सर्व उच्चांक मोडले आहे. शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलले असून पहाटेपर्यंत भाविकांची गर्दी दुर्गोत्सवात दिसून येत आहे.
यवतमाळच्या सुप्रसिद्ध दुर्गोत्सवात यावर्षी विविध मंडळांनी आकर्षक देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातीलही नागरिक वाहनाने यवतमाळात पोहोचत आहे. सायंकाळी ७ वाजतापासून पहाटे ३ वाजेपर्यंत भाविक दर्शन घेत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी पंचमीच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने सायंकाळपासूनच ग्रामीण भागातील नागरिक वाहनाने यवतमाळात पोहोचत होते. आर्णी मार्गावरील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाचा देखावा पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे.
या ठिकाणी नागरिक तासन्तास रांगेत लागून देवीचे दर्शन घेत आहे. येथील वडगाव रोड परिसरातील सुभाष मंडळाच्या दुर्गोत्सवातही मोठी गर्दी दिसून येत आहे. बालाजी चौकातील हिमालय पाहण्याची उत्सुकता ग्रामीण जनतेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच गुजरी चौकातील शिश महल पाहून भाविक अचंबित होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांचे लोंढे दिसत असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. (नगर प्रतिनिधी)