प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून
By Admin | Updated: June 18, 2017 00:50 IST2017-06-18T00:50:32+5:302017-06-18T00:50:32+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना

प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून
पुसद शहरातील घटना : अनैतिक संबंधात अडसर, दोघांनाही अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
सतपाल उर्फ बबलू सुरजसिंग यादव (३५) रा. मधुकरनगर पुसद असे मृताचे नाव असून तो गवंडी काम करीत होता. पोलिसांनी सतपालची पत्नी सुमन उर्फ बाली सतपाल यादव (३०) आणि तिचा प्रियकर शैलेष वसंत खिल्लारे (३०) रा. आंबेडकर वार्ड पुसद या दोघांना अटक केली. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सतपाल मृतावस्थेत असल्याची माहिती त्याचा भाऊ विजयपाल यादव याला मिळाली. त्याने थेट वसंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रभारी ठाणेदार ब्रिजपाल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टे, रमेश इंगळे, सुवर्णा कदम यांनी घटनास्थळ गाठले. तपास केला असता सतपालचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पुढे आले.
सतपाल यादवच्या पत्नीचे शैलेष खिल्लारेसोबत गत काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती पतीला मिळाली. त्यामुळे सतपालने या संबंधाला विरोध करीत होता. मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. दरम्यान सुमनने आपल्या पतीचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी तिने प्रियकर शैलेषची मदत घेतली. शुक्रवारच्या रात्री केव्हा तरी रुमालाने पतीचा गळा आवळला. पोलिसांनी या प्रकरणी सुमन आणि प्रियकर शैलेशला अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला रवाना केले. सतपालच्या मागे मुलगा आणि मुलगी आहे.