वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस
By Admin | Updated: June 24, 2016 02:44 IST2016-06-24T02:44:31+5:302016-06-24T02:44:31+5:30
तालुक्यातील अंजी शिवारात वन्य प्राण्यांच्या कळपाने हैदोस घातला असून ते शेतशिवारातील पिके उद्ध्वस्त करीत आहे.

वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : पिके बहरण्यापूर्वीच उद्ध्वस्त
घाटंजी : तालुक्यातील अंजी शिवारात वन्य प्राण्यांच्या कळपाने हैदोस घातला असून ते शेतशिवारातील पिके उद्ध्वस्त करीत आहे. यामध्ये आधीच नापिकीमुळे त्रस्त असलेला शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान होत आहे.
निजाम चव्हाण या शेतकऱ्याच्या तीन एकर शेतात उगविलेले संपूर्ण पीक वन्य प्राण्यांनी नष्ट केले आहे. चव्हाण यांनी ५ जून रोजी कपाशीच्या बियाण्याची टोबणी केली. ठिबक सिंचन पद्धतीने ओलित केले. त्यामुळे १०० टक्के लागवण यशस्वी झाली. दीड-दोन इंचापर्यंत पिके वाढली. या वाढलेल्या पिकांमुळे चव्हाण यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अचानक त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. त्यांच्यावर आज कपाळावर हात मारण्याची पाळी आली आहे. त्यांच्या तीन एकरातील उगवलेले पीक रानडुकरांच्या कळपाने उद्ध्वस्त केले. एकही रोप शिल्लक नाही. आता केवळ त्यांच्या शेतात प्रत्येक रोपाजवळ खोदलेले खड्डे शिल्लक आहे. त्यांनी या तीन एकरात चार हजार रुपयांच्या कपाशीच्या पाच बॅग लावल्या होत्या. तसेच इतर सर्व खर्च मिळून ६३ हजार ५०० रुपये त्यांचे खर्च झाले आहे. गावातील इतर शेतकऱ्यांचेही या वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)