तहसीलमध्ये उसळली प्रचंड गर्दी

By Admin | Updated: October 9, 2015 00:33 IST2015-10-09T00:33:02+5:302015-10-09T00:33:02+5:30

मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांची तहसील परिसरात प्रचंड गर्दी उसळली.

Heavy rush in Tahsil | तहसीलमध्ये उसळली प्रचंड गर्दी

तहसीलमध्ये उसळली प्रचंड गर्दी

शेवटचा दिवस : रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच, मारेगावात १३२, झरीत ७४ च्यावर अर्ज दाखल
मारेगाव : मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांची तहसील परिसरात प्रचंड गर्दी उसळली. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तर तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.
प्रथमच होणाऱ्या मारेगाव व झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मात्र राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक दुखावले गेले असून नाराजांना सांभाळताना राष्ट्रीय पक्षांची दमछाक होत आहे. १ नोव्हेंबरला होणाऱ्या मारेगाव नगरपंचायत निवडणुकीची शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. यात काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष आघाडीवर होते. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून सर्वांनाच ‘कामाला लागा’चा संदेश देण्यात आला होता. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र पक्षांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागल्याने नाराजांची संख्या मोठी आहे. या नाराजांना सांभाळून सोबत ठेवण्याची मोठी कसरत राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना करावी लागणार आहे. आत्तापर्यंत पक्षाचे गोडवे गाणारे, हे नाराज आता उघडपणे पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहे. त्यांना जागा दाखविण्याची भाषा बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नाराजांनी ‘अभी नही, तो कभी नही’ चा नारा देत अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. आता हे अपक्षच सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे करणार असल्याने, खुल्या प्रवर्गातील लढती काट्याच्या होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान मारेगाव येथे १३५ अर्ज दाखल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)

झरीतील राजकीय समीकरणे बदलली
झरी : झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून येथील राजकीय समीकरणे बदललेली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील राजकीय नेत्यांनीही निवडणुकीत रूची दाखविलेली आहे.
झरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथील सत्ता आपल्या ताब्यात राहिली, तर तालुक्यातील सत्तासूत्रे हलविता येतील, यासाठी काँग्रेस व भाजपासह इतरही पक्षांच्या बैठका झाल्या आहे. त्यात आपलेच उमेदवार कसे निवडून येतील, त्यासाठी कसा प्रचार करायचा, निवडणुकीची रणनिती कशी आखायची, यावर विचार करण्यात आला. ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी अटीतटीची व प्रतिष्ठेची झाली आहे.
गुरूवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारांसोबत दिसून येत होते. कार्यकर्ते उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्तता व अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. गुरूवारी शेवटचा दिवस असल्याने, या दिवशी ७५ च्यावर अर्ज दाखल झाले. येथील मतदारांची संख्या अतिशय मर्यादित व कमी आहे. मतदार संख्येच्या तुलनेत उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे.
अद्याप झरी येथील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नाही. मात्र येथे नक्कीच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक नगराध्यक्षपदी विराजमान होईल, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये अजूनही आरक्षणाबाबत उत्सुकता दिसून येत आहे. १७ जागांपैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आता निवडणूक जवळ येत असल्याने उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. मात्र मतदार अत्यंत कमी असल्याने काही प्रभागात केवळ ३0 ते ५0 मतांमध्ये उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rush in Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.