लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने १०५ गावांना जबर तडाखा बसला. सात हजार ७१५ हेक्टरवरील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. २७७ घरांची पडझड झाली. दुकानात पाणी शिरले, रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला.रविवारी सकाळी शहरात मुख्याधिकारी धीरज गोहाड, तर ग्रामीणमध्ये तहसीलदार सुभाष जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. दुपारपर्यंत प्राथमिक अहवाल देण्यात आला. संपूर्ण सर्व्हेनंतर नुकसानीची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह तुफान बरसला. केवळ दोनच तासात ११० मि.मी. पाऊस पडल्याने शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांसह ग्रामीण भागातील शेती, घरांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात काही गावात ढगफुटीसारखा पाऊस पडला. नदी, नाल्याकाठच्या गावात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके वाहून गेली. जमीन खरडून गेली. दारव्हा, लाडखेड, महागाव, बोरी, लोही, चिखली, मांगकिन्ही या ७ मंडळातील १०५ गावांत मोठे नुकसान झाले. दारव्हा-यवतमाळ राज्य मार्गावरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बसस्थानक परिसराला नदीचे स्वरूप- दारव्हा शहरातील लेंडी नाल्याचे पाणी आजुबाजूच्या परिसरात शिरल्याने यवतमाळ, आर्णी हे प्रमुख मार्ग, तसेच गोळीबार चौक, बसस्थानक चौकात कंबरभर पाणी साचले होते. या भागाला नदी, नाल्याचे स्वरूप आले होते. दुकाने अर्ध्याअधिक प्रमाणात पाण्याखाली गेली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नातूवाडी, अंबिकानगरसह विविध परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. नाल्याचे खोलीकरण, बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे व्यावसायिक, नागरिकांमध्ये नाराजी आहे.
विडूळ परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान
- विडूळ : उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचदेव) परिसरात शनिवारी तब्बल दीड तास पाऊस कोसळला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. धानोरा (सा) गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोयाबीनची दुबार, तिबार पेरणी केली होती. पावसामुळे पेरलेले सोयाबीन शेतातून अक्षरशः वाहून गेले. अनेकांची जमीन खरडून गेली. नाल्या काठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातही पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन अनेक घरात पाणी शिरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गावात साधी विचारपूस करण्यासाठी तलाठी येऊन गेले. मात्र, ते कोणालाही दिसले नाही. तलाठ्याबाबत गावात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसामुळे धानोरासह ब्राह्मणगाव, चालगणी, विडूळ, वांगी शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नुकसानीचे प्राथमिक पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करण्यास संबंधित तलाठ्यास कळविल्याचे सांगितले.