सहा तालुक्यात अतिवृष्टी

By Admin | Updated: July 13, 2016 03:06 IST2016-07-13T03:06:26+5:302016-07-13T03:06:26+5:30

गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

Heavy rain in six talukas | सहा तालुक्यात अतिवृष्टी

सहा तालुक्यात अतिवृष्टी

निळोणा ओव्हरफ्लो : जुगाद, दिग्रस, दुर्भला पुराचा वेढा, पाटणबोरी रस्ता बंद
यवतमाळ : गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पैनगंगा आणि खुनी नदीच्या संगम परिसरातील झरी तालुक्यात सर्वाधिक तडाखा बसला आहे. जुगाद, दिग्रस, दुर्भला पुराचा वेढा पडला असून, एनडीआरएफचे जवान बचावासाठी रवाना झाले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, निम्न वर्धा आणि अधर पूस प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने नदीतीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात सहा तालुक्यात ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. त्यामुळे येथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यात आर्णी १११ मिमी, दारव्हा ६६, दिग्रस ९१, पुसद ९९, महागाव ८९ आणि झरीत ९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात मान्सूनची सक्रियता वाढल्याने दक्षिणेकडील पावसाचे ढग विदर्भाकडे सरकले. त्यामुळे सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मासिक सरासरीच्या १३८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून, हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४८ टक्के आहे.
उमरखेड तालुक्यातही पैनगंगेचा तडाखा बसला. पळशी गावातील आठ शेळ्या पुरात वाहून गेल्या. दिग्रस तालुक्यातील धावंडा नदीचे पात्रही फुगले असून सततच्या पावसाने तालुक्यातील ५० घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीतीरावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)

पैनगंगा आणि खुनी नदीमुळे हाहाकार
या पावसाचा सर्वाधिक तडाखा झरी तालुक्याला बसला. मंगळवारी दुपारपर्यंत जुगाद गावाला पैनगंगेचा वेढा पडला होता. दिग्रस आणि दुर्भ ही दोन गावे पाण्याखाली आली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून घरांची पडझड झाली आहे. सायंकाळी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना यांनी एनडीआरएफच्या चमूला पाचारण केले. दोन बोटींसह आपत्ती निवारणचे पथक रवाना झाले आहे. खुनी आणि पैनगंगा नदीचा प्रवाह धोक्याची पातळी ओलांडून वाहात आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. खुनी नदीला आलेल्या पुरामुळे पाटणबोरी मार्ग अनेक तास बंद होता.

 

Web Title: Heavy rain in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.