पुसद उपविभागात दमदार पाऊस

By Admin | Updated: June 20, 2016 02:19 IST2016-06-20T02:19:17+5:302016-06-20T02:19:17+5:30

चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी कोसळलेल्या धो-धो पावसाने मोठा दिलासा मिळाला.

Heavy rain in Pusad subdivision | पुसद उपविभागात दमदार पाऊस

पुसद उपविभागात दमदार पाऊस

शेतकरी सुखावला : पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी पाऊस
ंपुसद : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी कोसळलेल्या धो-धो पावसाने मोठा दिलासा मिळाला. पुसद उपविभागात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पुसद तालुक्यात ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ९५ मिमी पाऊस कोसळला आहे. तर महागाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी धुव्वाधार पाऊस बरसला. ७४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मृग नक्षत्र लागल्यानंतरही पावसाचे कुठेच वातावरण दिसत नव्हते. बळीराजासह शेतकरी चिंतातूर झाला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या. परंतु पाऊस न आल्याने या पेरण्या संकटात सापडल्या होत्या. मात्र शनिवारी रात्र भर पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. १ जून ते १७ जूनपर्यंत ४१ मिमी पाऊस कोसळला तर शनिवारी ५४ मिमी असा पुसद तालुक्यात ९५ मिमी पाऊस कोसळला आहे. मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुसदकरांना पावसाने मोठा दिलासा दिला आहे.
पूस नदीचे पात्र खळखळून वाहत असून विहिरी व हातपंपाच्या जलस्रोतात वाढ झाली आहे. खोळंबलेल्या पावसाने रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या.
महागाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजता धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने नदीनाले भरुन वाहू लागले. गुंज गावातील नाल्याला आलेल्या पुराने एक तास वाहतूक ठप्प होती. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. १८ जून रोजी तालुक्यात ७४ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद असून आतापर्यंत तालुक्यात ९४ मिमी पाऊस कोसळला आहे. तालुक्यात ६२ हजार ८५० हेक्टर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. परंतु अपेक्षित पाऊस न आल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. अशातच शनिवारी झालेल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहे. तर कृषी माल विक्रेत्यांची बाजारपेठही चांगलीच फुलली आहे. फुलसावंगी परिसरात मृगाचा दमदार पाऊस बरसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई संपुष्टात आली आहे. कोरड्या पडलेल्या नदी व नाल्यांमध्ये पाण्याचा खळखळून वाहत आहे. पावसाचे आगमन झाल्याने उत्साही वातावरण आहे. (लोकमत चमू)

Web Title: Heavy rain in Pusad subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.