दोन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस
By Admin | Updated: June 20, 2015 00:41 IST2015-06-20T00:41:52+5:302015-06-20T00:41:52+5:30
दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने अमरावती जलमय झाली.

दोन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस
१६२.५ मि.मी. पाऊस : नियोजनही पाण्यात
अमरावती : दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने अमरावती जलमय झाली. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.
विदर्भात मान्सून दाखल झाल्यापासून ढग, उन्ह व पावसाचा लपंडाव सुरु झाला. दिवसा उन्ह व ढगाळ वातावरणामुळे उकाडा निर्माण होत आहे.
मात्र, सायंकाळनंतर पडणाऱ्या धुंवाधार पावसामुळे थोडा दिलासाही मिळत आहे. धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत.
अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन विभागाचीही दमछाक होत आहे. दिवसाच्या पावसामुळे घरात शिरलेले पाणी काढण्यास आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिक त्रास जाणवत नाही. मात्र, सायंकाळनंतर होणाऱ्या धुंवाधार पावसामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
शहरातील फरशी स्टॉप, शकंर नगर, दीपनगर, स्टेट बॅक कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, आदर्शनगर अशा विविध भागांत पावसाच्या पाण्याने कहर केला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आपत्कालीन कर्मचारी पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आपत्कालीन कक्षात २२ कर्मचारी कार्यरत आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी ते सज्ज असून दिवसरात्र धावपळ करीत आहे.
आतापर्यंत १६२.५ मि.मी पाऊस
पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडत आहे. दिवस ऊन्ह, ढग व तासभर पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे. दररोज तासभर धुंवाधार पाऊस पडत असल्यामुळे शहर जलमय होत आहे.
आतापर्यंत शहरात १६२.४ मिलीमीटर पावसांची नोंद श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाने घेतली आहे. (प्रतिनिधी)
२० ते २२ मुसळधार
ओरिसाच्या किनाऱ्यावर पश्चिम मध्यबंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती आहे. येत्या २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे. गुजरात ते केरळ कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून उत्तर राजस्थान, छत्तीसगड मार्गे बंगालचा उपसागर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. अरबी समुद्रात कमी दाब आणि चक्राकार वारे आहेत. या सर्व स्थितीमुळे २० ते २२ जून दरम्यान विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ आणि २३ जून दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.