एप्रिलमध्ये मे हीट
By Admin | Updated: April 27, 2015 01:57 IST2015-04-27T01:57:29+5:302015-04-27T01:57:29+5:30
गत आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्यातच मे हीटचा तडाखा जाणवत आहे.

एप्रिलमध्ये मे हीट
यवतमाळ : गत आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागला असून एप्रिल महिन्यातच मे हीटचा तडाखा जाणवत आहे. दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असून उष्माघाताच्या रुग्णातही वाढ झाल्याचे दिसत आहे.
यवतमाळ शहराचा पारा गत तीन-चार दिवसांपासून ४० अंशाच्या आसपास आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वत्र जाणवत आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाच्या झळा बसतात. दुपारी तर कुणी घराबाहेर निघायलाही तयार नाही. उन्हाच्या या तडाख्याने शीतपेय व फळांची मागणी वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवतो.
वाढत्या उन्हाचा भाजीपाला व इतर पिकांवर परिणाम जाणवत आहे. भाजीपाला करपत असून दुपारी शेतात काम करायलाही मजूर मिळत नाही. शेतकऱ्यांनी मजुरांच्या कामाच्या वेळात बदल केला असून दुपारच्या ऐवजी सकाळीच शेतात काम करायला मजूर जाणे पसंत करीत आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप वाढला आहे. उष्माघाताच्या रुग्णातही वाढ झाली आहे. लग्न समारंभालाही वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. आणखी मे महिना बाकी असल्याने पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)