उमरखेड तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली
By Admin | Updated: August 19, 2015 02:45 IST2015-08-19T02:45:33+5:302015-08-19T02:45:33+5:30
तालुक्याच्या अडीच लाख लोकसंख्येकरिता असलेली आरोग्य यंत्रणा पावसाळ्याच्या दिवसात कोलमडली असून उमरखेड ...

उमरखेड तालुक्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली
उमरखेड : तालुक्याच्या अडीच लाख लोकसंख्येकरिता असलेली आरोग्य यंत्रणा पावसाळ्याच्या दिवसात कोलमडली असून उमरखेड येथील शासकीय रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर योग्य उपचारच होत नाही. यामुळे रुग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असून यासंधीचा फायदा बोगस डॉक्टर घेत आहे.
उमरखेड तालुक्यात उमरखेड येथे राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय कुटीर रुग्णालय, सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३६ आरोग्य उपकेंद्र आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची धुरा सांभाळण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. उमरखेड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर खासगी प्रॅक्टीसमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रेफर करण्याची घाई येथील कर्मचाऱ्यांना झालेली असते. शासकीय रुग्णालयात घाणीचे साम्राज्य असून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. येथील रुग्णालयात एक्स-रे मशीन नाही. रक्ताच्या तपासण्या होत नाही. शिवाय रुग्णांना औषधी बाहेरुन आणण्याचा सल्ला दिला जाते.
सध्या शहरासह ग्रामीण भागात तापाची साथ पसरली आहे. हातपाय दुखणे, ताप येणे, डायरिया अशी लक्षणे दिसत आहे. शेकडो रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयात दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे दमाच्या आजारात वाढ झाली आहे. मात्र शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ती मंडळी बोगस डॉक्टरांच्या तावडीत सापडतात. तालुक्यातील दराटी, सोनदाबी, जेवली, बिटरगाव, भवानी, मेट, चिखली, बाळदी, चुरमुरा, अकोली, पिरंजी, कृष्णापूर यासह अनेक गावात बोगस डॉक्टरांची दुकानदारी सुरू आहे.
तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला रिक्त पदाचे ग्रहण लागले असून रुग्णांना वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नसल्याची ओरड होते. १२० किलोमीटर विस्तारीत या तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३६ आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु अनेक ठिकाणी रिक्त पदांचे ग्रहण आहे. बंदी भागातील उपकेंद्रात आरोग्य सेविका आणि सेवकांची पदे रिक्त आहे. मुळावा येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद प्रभारावर सुरू आहे. दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाही नाही. (शहर प्रतिनिधी)