नेरमध्ये आरोग्य सेवा कोलमडली
By Admin | Updated: December 31, 2016 01:08 IST2016-12-31T01:08:35+5:302016-12-31T01:08:35+5:30
नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे

नेरमध्ये आरोग्य सेवा कोलमडली
वरिष्ठांचे दुर्लक्ष : ग्रामीण यंत्रणा ढेपाळली
नेर : नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना ही सेवा देण्यात चालढकल करत आहे. परिणामी नागरिकांना शहरात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडूनही ही बाब दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.
प्राथमिक आरोग्य केंद्राला लगतची २५ ते ३० गावे जोडण्यात आलेली आहे. शिवाय उपकेंद्रांना पाच ते दहा गावे जोडली गेली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानेही बांधण्यात आलेली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु या निवासस्थानांचा वापर काही अधिकारी आणि कर्मचारीच करत आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ठरलेल्यावेळी उघडले जात नाही. उघडले तरी अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोयीने येतात. रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असतात. कित्येक तासपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर डॉक्टर दाखल होतात. तेही काही रुग्णांची तपासणी करून निघून जातात. गंभीर रुग्णांना तर या आरोग्यसेवेचा उपयोग फार कमी प्रमाणात होतो. एक तर डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि झाले तरी तालुक्याच्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला जातो. साध्या साध्या आजारावरही उपचार करण्याचे टाळले जात असल्याचे प्रकार घडत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना तुसडेपणाची वागणूक दिल्या जात असल्याच्या तक्रारी होतात. संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळेही तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा नागरिकांना पुरविण्यात काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)