मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाची मदत
By Admin | Updated: June 17, 2016 02:49 IST2016-06-17T02:49:36+5:302016-06-17T02:49:36+5:30
आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ८५ हजारांची मदत देण्यात आली.

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाची मदत
यवतमाळ : आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ८५ हजारांची मदत देण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी व्हॉटस्अपद्वारे पुढाकार घेतला, हे विशेष.
उमरखेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कंत्राटी तालुका सिकलसेल पर्यवेक्षक मिलिंद नारायण राठोड रा. सावरगाव गोरे ता. पुसद या युवकाचा काही दिवसांपूर्वी घरून आपल्या कार्यक्षेत्रात जाताना कुपटीजवळ वाहन अपघातात मृत्यू झाला. कर्ता पुरुष गेल्याने मिलिंद राठोड यांच्या घरातील परिस्थिती बिकट झाली आहे.
कंत्राटी तत्वावर कार्यरत असल्याने राठोड यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून निधी किंवा सुरक्षा लाभ मिळणे कठीण होते. त्यावर तोडगा म्हणून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी मदत निधी देण्याचे ठरविले. निधी संकलनासाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे आवाहन करण्यात आले. त्याला भरीव प्रतिसाद लाभून ८५ हजारांचा निधी गोळा झाला. हा मदत निधी मिलिंद राठोड यांचे वडील नारायण राठोड यांना सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमासाठी आरोग्य कार्यालय व उपजिल्हा रुग्णालय पुसद, वणी, घाटंजी, नेर येथील कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. यापुढे तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने विमा सुरक्षा धोरण लागू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)