आरोग्य विभागाला रिक्त पदांचा ज्वर

By Admin | Updated: October 9, 2016 00:15 IST2016-10-09T00:15:54+5:302016-10-09T00:15:54+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. नव्याने पाच डॉक्टर रूजू झाले असले,...

Health Department feeds vacant posts | आरोग्य विभागाला रिक्त पदांचा ज्वर

आरोग्य विभागाला रिक्त पदांचा ज्वर

पाच नवीन डॉक्टर : तरीही आरोग्य केंद्र, उपकेंद्र वाऱ्यावर
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. नव्याने पाच डॉक्टर रूजू झाले असले, तरी नऊ जणांनी रूजू होणे टाळले आहे. परिणामी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचेच आरोग्य बिघडले आहे.
जिल्ह्यात ६३ आरोग्य केंद्र आहे. प्रत्येक केंद्राशी प्रत्येकी दोन उपकेंद्र जोडण्यात आले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. मात्र अनेक केंद्रांमध्ये केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहेत. काही ठिकाणी तर एकही वैद्यकीय अधिकारी नाही. अशा आरोग्य केंद्रांचा प्रभार लगतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तालुका आरोग्य अधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचेच आरोग्य संकटात सापडले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्वसाधारण, स्थायी समिती आणि आरोग्य समितीच्या सभेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. सोबतच केंद्र आणि उपकेंद्रात संबंधित कर्मचारी उपस्थित नसतात, अशी ओरड होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. मात्र कार्यरत कर्मचारीही उपस्थित राहात नाहीत, योग्य काम करीत नसल्याची ओरड सदस्यांकडून होते. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर १४ डॉक्टरांना रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.
१४ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी केवळ पाच जण संबंधित ठिकाणी रूजू झाले आहे. उर्वरित नऊ जणांनी रूजू होणे टाळले आहे. त्यामुळे आता एकूण १७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तत्पूर्वी २२ पदे रिक्त होती. नव्याने पाच डॉक्टर रूजू झाल्याने आरोग्य विभागाला तूर्तास थोडा दिलासा मिळाला आहे. तथापि अद्यापही अतिरिक्त व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी पद रिक्तच आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Health Department feeds vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.