आरोग्य लिपिकाकडून सव्वा लाखांची ‘डिमांड’
By Admin | Updated: June 21, 2017 00:11 IST2017-06-21T00:11:41+5:302017-06-21T00:11:41+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा बिल काढून देण्यासाठी एक लाख २० हजारांची मागणी करणाऱ्या आरोग्य ...

आरोग्य लिपिकाकडून सव्वा लाखांची ‘डिमांड’
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा बिल काढून देण्यासाठी एक लाख २० हजारांची मागणी करणाऱ्या आरोग्य लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालयातील मनीष केशवराव अग्रवाल, असे लाच मागणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी आणि रजा बिल काढून देण्यासाठी मनीषने चक्क एक लाख २० हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी निवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तक्रारीची पडताळणी केली. एसीबीचे पथक आणि शासकीय पंचासमक्ष आरोपीने लाचेच्या एक लाख २० हजार रूपयांपैकी ५० हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. यावरून मनीष अग्रवालविरूद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एन. एस. तडवी यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पथकाने पार पाडली.