२२ हजार नागरिकांचे आरोग्य चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:42 IST2021-08-15T04:42:15+5:302021-08-15T04:42:15+5:30
अविनाश खंदारे फोटो उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरातील सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्राला १७ गावे जोडली आहे. मात्र, त्यातील ...

२२ हजार नागरिकांचे आरोग्य चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हाती
अविनाश खंदारे
फोटो
उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरातील सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्राला १७ गावे जोडली आहे. मात्र, त्यातील २२ हजार नागरिकांसाठी केवळ चार आरोग्य कर्मचारी आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सापडले आहे.
सोनदाबी आरोग्य केंद्र विदर्भाच्या शेवटच्या टोकावर आहे. या केंद्राअंतर्गत बिटरगाव बु., अकोली, जेवली, मोरचंडी, सोनदाबी अशी पाच उपकेंद्रे आहे. यात अकोली, सोनदाबी, अकोली तांडा, मुरली, पिंपळगाव, देवरंगा, गणेशवाडी, जेवली, बिटरगाव, मथुरानगर, भोजनगर, रतननगर, मोरचंडी, एकम्बा, मन्याळी तांडा अशी एकूण १७ गावे केंद्र व उपकेंद्राला जोडण्यात आली आहे. या परिसरात जवळपास २२ हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र केंद्रात चार कर्मचारी आहेत. त्यात दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक व कंत्राटी आरोग्यसेविका यांचा समावेश आहे.
या केंद्रात एकूण २५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल २१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत चार कर्मचाऱ्यांवर आरोग्याचा गाडा हाकला जात आहे. याच कर्मचाऱ्यांना शासकीय मोहिमा राबवाव्या लागतात. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतो. रस्तेही दयनीय आहे. केंद्र व उपकेंद्रात साहित्याची कमतरता आहे. २००८ मध्ये आरोग्य विभागाकडून मिळालेली रुग्णवाहिका पूर्णपणे निकामी झाली आहे. त्यामुळे गेल्या एका वर्षापासून रुग्णवाहिका बंद आहे. वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होतो. त्यामुळे लसीकरणाला फटका बसतो. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. परिणामी १७ गावातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सापडले आहे.
बॉक्स
वन्यप्राण्यांचा धोका, गावकरी चिंतेत
बंदी भागात वारंवार वन्यप्राणी नागरिकांवर हल्ले करतात. मात्र, जखमींना सोनदाबी आरोग्य केंद्र व इतर उपकेंद्रात आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. औषधे व उपकरणाची कमतरता असल्यामुळे आरोग्य सुविधा मिळत नाही. प्रसूतीसाठी महिलांना मरण यातना सोसाव्या लागतात. त्यांना शहरी भागातील खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे केंद्राला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.
कोट
सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २५ पदे आहे. औषध निर्माता अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांसह २१ पदे रिक्त आहे. गेल्या एक वर्षापासून रुग्णवाहिका बंद आहे. या सर्वांची माहिती वेळोवेळी वरिष्ठांना दिली.
डॉ. चंदा पेडलवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनदाबी