हरिनामाच्या गजराने ढाणकी दुमदुमली
By Admin | Updated: February 15, 2016 02:44 IST2016-02-15T02:44:08+5:302016-02-15T02:44:08+5:30
तब्बल आठ दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने ढाणकी येथे नागरिकांना आनंदाची अनुभूती मिळाली.

हरिनामाच्या गजराने ढाणकी दुमदुमली
हरिनाम सप्ताह : २० हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ
ढाणकी : तब्बल आठ दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाने ढाणकी येथे नागरिकांना आनंदाची अनुभूती मिळाली. यावेळी हरिनामाच्या गजराने गाव दुमदुमले. ढाणकीसह परिसरातील शेकडो भाविक या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले.
ढाणकी येथे दरवर्षीच हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा पार पडला. सकाळी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा भजन, तर दुपारी भावार्थ रामायण, सायंकाळी हरिपाठ, भारूड आणि रात्री हरिकीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी भक्तगणांना मिळाली. ज्ञानेश्वरी पारायण रामदास महाराज व सूर्यभान महाराज यांनी, भावार्थ रामायण मधुबूवा जोशी यांच्या सुश्राव्य वाणीतून कथन झाले.
हभप अनंता महाराज कनवाळे, सुरेश महाराज पोफाळी, पंढरीनाथ महाराज पळसगावकर, डॉ. शरद अंबेकर, ज्ञानेश्वर इंगळे, उल्हास सूर्यवंशी, श्रीकांत पानकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा गोडावा गायला. त्यांना तबला वादक सुनील केशेवाड, मृदंगाचार्य गौतम इंगोले, रामेश्वर तीरमकदार तसेच उद्धव सांबरखेड, दादाराव बाभूळगावकर, परशराम ब्रह्मटेके, विनायक नरवाडे, तसेच ढाणकी, खरूस, टेंभुर्दरा, गांजेगाव येथील भजनी मंडळाची साथ लाभली.
हरिनाम सप्ताहाच्यानिमित्ताने नवग्रह देवतांची ग्राम प्रदक्षणा व मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. महर्षी मार्कंडेय जयंती सोहळाही साजरा करण्यात आला. हरिनाम सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने झाला. महाप्रसादाचा लाभ २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी घेतला. विठ्ठल-रूख्माई वारकरी मंडळ आणि गावकऱ्यांनी नेटके नियोजन केले होते. (वार्ताहर)