हरणाचा शिकारी उमरखेड वन कर्मचाऱ्यांच्या तावडीतून पसार
By Admin | Updated: July 15, 2016 02:35 IST2016-07-15T02:35:24+5:302016-07-15T02:35:24+5:30
हरणाची शिकार करणारा शिकारी वन विभागाच्या तावडीतून पसार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

हरणाचा शिकारी उमरखेड वन कर्मचाऱ्यांच्या तावडीतून पसार
उमरखेड : हरणाची शिकार करणारा शिकारी वन विभागाच्या तावडीतून पसार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी येथील वन उपज तपासणी नाक्यावर मृत हरणासह शिकाऱ्याला अटक करण्यात आली होती.
दिनेश अशोक जाधव (३०) रा.दिंडाळा ता.उमरखेड असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी येथील महागाव मार्गावरील जुन्या वन तपासणी नाक्यावर अटक केली होती. त्याच्या जवळ पोत्यात बांधलेले दोन मृतावस्थेतील हरण आढळले होते. त्याला वन विभागाने ताब्यात घेतले. चौकशी सुरू होती. दरम्यान, तो रात्री वन रक्षक जी.एस. कन्नाळे, अरविंद राठोड आणि चौकीदार अंतराम चव्हाण यांच्या ताब्यात होता. पहाटे ४ वाजताच्या सुमारास सर्वांची नजर चुकवून दिनेश जाधव पसार झाला.
हा प्रकार उघडकीस येताच वन विभागात एकच खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. उपविभागीय वन अधिकारी एस.आर. दुमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकाराची चौकशी करून दोषीवर तत्काळ कारवाई करू, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)