कोहळा प्रकल्पाच्या कामात अडथळा, ४५ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: April 29, 2016 02:31 IST2016-04-29T02:31:17+5:302016-04-29T02:31:17+5:30
कोहळा येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या घडभरणीच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी या गावातील ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोहळा प्रकल्पाच्या कामात अडथळा, ४५ जणांवर गुन्हा
नेर : कोहळा येथे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या घडभरणीच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी या गावातील ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमवून काम बंद पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
लघु पाटबंधारे विभागातर्फे या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. २७ एप्रिल रोजी या प्रकल्पाच्या घडभरणीचे काम सुरू होते. यावेळी कोहळा येथील काही लोकांनी कामाच्यास्थळी गोंधळ घालून काम बंद पाडले. या प्रकाराची तक्रार लघु पाटबंधारे उपविभाग यवतमाळचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ज्ञानेश्वर चौधरी यांनी पोलिसात दिली.
तक्रारीवरून कोहळा येथील जगदीश तलवारे, जगदीश खासदार, सुरेश खडसे, शंकर डवरे, नरेंद्र डवरे, महेंद्र गुजर, पंजाब आडेळे, पारवे, राजू नगराळे यांच्यासह ४० ते ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेर पोलिसांनी सुरू केला आहे. कोहळा येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. मागणी करूनही पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे या गावकऱ्यांनी काम बंद पाडले होते. (तालुका प्रतिनिधी)