शासकीय जलतरण तलाव जाणार खासगी संस्थेच्या हातात
By Admin | Updated: March 19, 2015 02:10 IST2015-03-19T02:10:55+5:302015-03-19T02:10:55+5:30
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळकरांच्या सेवेत सुरू झालेला शासकीय जलतरण तलाव ‘पांढरा हत्ती’ ठरू पाहत आहे.

शासकीय जलतरण तलाव जाणार खासगी संस्थेच्या हातात
नीलेश भगत यवतमाळ
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळकरांच्या सेवेत सुरू झालेला शासकीय जलतरण तलाव ‘पांढरा हत्ती’ ठरू पाहत आहे. खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नसल्याने शासकीय जलतरण तलावाचे खासगीकरण करण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा संकूल समितीला घ्यावा लागला. लवकरच हा तलाव चालविण्यासाठी खासगी व्यक्तीच्या ताब्यात जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
यवतमाळ शहरातील आझाद मैदान परिसरात प्रशस्त आणि सर्वांगसुंदर असा शासकीय जलतरण तलाव बांधण्यात आला. या तलावाचे लोकार्पण फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आले. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा क्रीडा संकूल समितीच्या नियंत्रणात या तलावाचे नियोजन व प्रशासन चालविले जाते. यवतमाळात सुसज्ज जलतरण तलाव झाल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पोहण्यासाठी हक्काचे ठिकाण झाल्याची भावना होती. मात्र अगदी सुरुवातीलाच या जलतरण तलावाचे खासगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.
यासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र तांत्रिक बाब व काही नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे निविदा मागविण्याचा दोनदा निर्णय रद्द करावा लागला. त्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने हा जलतरण तलाव स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला.
प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या या जलतरण तलावाला यवतमाळकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या प्रतिसादातून शासनाला मोठे उत्पन्न मिळाले. मात्र एक वर्षानंतर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने सर्वांना अंधारात ठेऊन जलतरण तलाव प्रशिक्षणाच्या नावाखाली जवळच्या व्यक्तीला दिला. त्यातून भरघोस कमाई केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.
त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. मात्र आता जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने जिल्हा क्रीडा संकूल समितीने जलतरण तलाव, हॉटेल, जीम हॉल कंत्राटी पद्धतीने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने यासाठी निविदा काढली आहे. २५ मार्चपर्यंत अनुभवी संस्था व व्यक्तींकडून मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही अटी आहे. सध्या चार निविदा प्रपत्राची विक्री झाल्याचे प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी अशोक खंडारे यांनी सांगितले.