घरकुलासाठी अपंगांची फट
By Admin | Updated: April 29, 2015 23:55 IST2015-04-29T23:55:19+5:302015-04-29T23:55:19+5:30
इंदिरा आवास योजनेतून घरकूल मिळावे, यासाठी अपंग बांधवांची फरफट सुरू आहे. सदर योजनेंतर्गत त्यांना घरकुलाचा लाभ दिला जावा,

घरकुलासाठी अपंगांची फट
आदेश पायदळी : नेर पंचायत समितीची टोलवाटोलवी
नेर : इंदिरा आवास योजनेतून घरकूल मिळावे, यासाठी अपंग बांधवांची फरफट सुरू आहे. सदर योजनेंतर्गत त्यांना घरकुलाचा लाभ दिला जावा, या शासनाच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली जात आहे. एकूणच पंचायत समितीकडून अपंगांची अवहेलना सुरू आहे.
मानसिक व शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीला इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल देण्याचे केंद्र शासनाचे स्पष्ट आदेश आहे. याची तालुका पातळीवर अंमलबजावणी होत नाही. सदर योजनेच्या लाभासाठी तालुक्यातील अपंगांनी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला. मात्र तेथे त्यांची कुचेष्टा चालविली आहे. कित्येक दिवसपर्यंत घरकुलाचा लाभ तर दिलाच जात नाही. शिवाय समाधानकारक उत्तरही देण्याचे पंचायत समितीकडून टाळले जाते.
४० टक्केपेक्षा जास्त मानसिक अपंग असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या आहे. मात्र या बाबत राज्य शासनासोबतच तालुका पातळीवरील अधिकारीही गंभीर नाही. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशातही अपंगांना घरकूल देण्याबाबतच्या स्पष्ट सूचना नाही. हीच बाब संबंधित अधिकारी लाभार्थ्यांपुढे मांडत आहे.
बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे मिळणाऱ्या मिळकतीतून अपंग बांधव आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी त्यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाची अपेक्षा आहे. परंतु अधिकारीस्तरावर त्यांच्या आशेवर पाणी फेरण्याचेच प्रयत्न होत आहे. मोझर येथील राजेश शेंडे हे गेली चार महिन्यांपासून घरकुलाच्या लाभासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहे. अजून तरी त्यांचे कागदपत्र घरकुलासाठी पुढे सरकले नाही. सदर बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
(तालुका प्रतिनिधी)