ट्रक धडकल्याने अर्धे यवतमाळ अंधारात
By Admin | Updated: October 1, 2015 02:31 IST2015-10-01T02:31:55+5:302015-10-01T02:31:55+5:30
येथील भोसा परिसरातील घाटंजी मार्गावर बुधवारी सकाळी सहा वाजता एका ट्रकने विजेच्या तीन खांबाना धडक दिली.

ट्रक धडकल्याने अर्धे यवतमाळ अंधारात
यवतमाळ : येथील भोसा परिसरातील घाटंजी मार्गावर बुधवारी सकाळी सहा वाजता एका ट्रकने विजेच्या तीन खांबाना धडक दिली. यामध्ये तीनही खांब वाकल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. यामुळे अर्ध्या यवतमाळ शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
एमएच२६ ए२४४९ क्रमांकाचा ट्रक खड्डा चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटून वीजेच्या खांबावर जाऊन धडकला. भरधाव ट्रकच्या धडकेत तीन खांब वाकले. ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून पळून गेला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. या प्रकरणी वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता गोपाल कुंडकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघातामुळे शहरातील उमरसरा, दर्डा नगर, वाघापूर, धामणगाव मार्ग, राजेंद्र नगर, नेहरू नगर, गांधी नगर, आर्णी मार्ग, दारव्हा रोड, गांधी चौक, मुख्य बाजार पेठ आदी परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. उमरसऱ्यासह इतर काही भागातील वीज पुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे कनिष्ठ अभियंता माळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)