राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती अर्धा टक्का
By Admin | Updated: July 12, 2017 00:28 IST2017-07-12T00:28:06+5:302017-07-12T00:28:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देऊनही राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्जवाटपातील गेल्या दोन आठवड्यातील प्रगती अवघी अर्धा टक्का पुढे सरकली आहे.

राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती अर्धा टक्का
दोन आठवड्यातील कर्जवाटप : लाखो शेतकरी अखेर सावकारांच्या दारी
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देऊनही राष्ट्रीयकृत बँकांची पीक कर्जवाटपातील गेल्या दोन आठवड्यातील प्रगती अवघी अर्धा टक्का पुढे सरकली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांवर सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पेरणीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात कपाशी व सोयाबीनची पेरणी आटोपली तरीही थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे जिल्ह्यातील तब्बल तीन लाख शेतकऱ्यांना अखेर सावकारचे उंबरठे झिजवावे लागले. त्यावरच ९२ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. दुसरीकडे अद्यापही कर्जमाफीच्या आदेशाची अंमलबजावणी बँकांनी केलीच नाही. त्यात जिल्हा बँकेकडे पैसा नाही. राष्ट्रीयकृत बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सूचना नाही आणि ग्रामीण बँकांनी केवळ ३५८ लोकांना १० हजारांची मदत दिली आहे.
कर्जमाफीच्या यादीत दोन लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. तथापि या शेतकऱ्यांसमोर जाचक निकषांमुळे आडकाठी निर्माण झाली. गेल्या गत सव्वा महिन्यात ११ दिवस पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱ्यांनी बँकांच्या शेकडो येरझारा मारल्या. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परिणामी तीन लाख शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे.