अर्ध्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा कागदावरच
By Admin | Updated: August 21, 2015 02:56 IST2015-08-21T02:56:35+5:302015-08-21T02:56:35+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या.

अर्ध्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा कागदावरच
महागाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ग्रामसेवकांच्या रिक्त पदाने निम्म्या पेक्षा अधिक ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे कामकाज कागदावर नोंदवून सोपस्कार पार पाडले.
महागाव तालुक्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहे. तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी ६६ पदे मंजूर आहे. त्यापैकी ४१ ग्रामसेवक कार्यरत होते. त्यापैकी पाच जणांची बदली, सहा जण निलंबित आणि तीन जण कायम रिकामे आहे. तर तीन ग्रामसेवकांची निवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. तर पोपुलवाड नावाचा ग्रामसेवक अडीच वर्षांपासून विना परवानगी गैरहजर आहे. त्यामुळे ७६ ग्रामपंचायतीचा कारभार केवळ २६ ग्रामसेवकांच्या भरोश्यावर सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले.
ग्रामसभेला सरपंचासोबतच ग्रामसेवकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ७६ ग्रामपंचायती आणि २६ ग्रामसेवक अशा परिस्थितीत ग्रामसभा घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी शिक्षकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला. २२ ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे सोपस्कार पार पाडले.
घरकुल, शौचालय, प्लास्टिक निर्मूलन, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा तीन टक्के निधी अपंगावर खर्च, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामसभेत समित्या स्थापन करणे, आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तयार करणे, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, सिंचन विहिरींची प्रतीक्षा यादी, ग्रामस्तरीय दक्षता समिती आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते.
परंतु शिक्षकांना या बाबीची माहिती नाही. त्यामुळे केवळ शासकीय सोपस्कार पार पाडून महत्वाच्या विषयावर चर्चाच झाली नाही. विशेष म्हणजे ७६ ग्रामपंचायतीसाठी १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला हजर रहावयाचे होते. परंतु ७६ ठिकाणी १२ अधिकारी एकाच वेळी कसे उपस्थित राहतील हा ही प्रश्नच आहे. एका दिवशी आठ ग्रामसभा घेता येणे शक्य नाही. ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने विकास कामांचा बोजवारा उडत असून आता ग्राम विकासासाठी ग्रामसेवकांची नियुक्ती कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)