पहिल्याच दिवशी अर्धेअधिक कर्मचारी ठरले ‘लेटलतिफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:05+5:30
वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी ‘लेटलतीफ’ ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९.३० वाजताच कार्यालयात ‘दस्तक’ दिली. सोमवारी ‘लोकमत’ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९.३५ वाजता ‘लोकमत’ च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी अर्धेअधिक कर्मचारी ठरले ‘लेटलतिफ’
वणी : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचा आठवडा संपल्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतर सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळी म्हणजे ९.४५ वाजता कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. परंतु वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी ‘लेटलतीफ’ ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९.३० वाजताच कार्यालयात ‘दस्तक’ दिली. सोमवारी ‘लोकमत’ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९.३५ वाजता ‘लोकमत’ च्या दोन वेगवेगळ्या चमू अनुक्रमे तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात पोहचल्या. तहसील कार्यालयात तहसीलदार श्याम धनमने यांच्यासह चारपैैकी दोन नायब तहसील हजर होते. यासोबतच बोटावर मोजण्याइतके कर्मचारी उपस्थित होते. तहसीलच्या प्रत्येकच विभागात एक, दोन कर्मचारी फाईली हुसकत तर काही कर्मचारी मोबाईलमध्ये गुंतून असल्याचे दिसून आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात एसडीओ डॉ.शरद जावळे यांच्यासह त्यांचे काही कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले.
स्वाक्षरी करून कर्मचारी बाहेर
१० वाजतानंतर वणी तहसील कार्यालयात एकेकाने कर्मचाऱ्यांचे आगमन होत होते. मस्टरवर स्वाक्षरी करून काही कर्मचारी चहा पिण्यासाठी कार्यालयाबाहेर पडताना दिसले. वणीतील तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती आमने-सामने आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांची दररोजच मोठी गर्दी पहायला मिळते.
वणी पंचायत समितीत अभियंत्यांना ‘लेटमार्क’
वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर हे स्वत: ९.३० वाजता कार्यालयात येऊन बसले. परंतु ठरवून दिलेल्या वेळेत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होते. येथील दोन कनिष्ठ अभियंते १० वाजतानंतरही कार्यालयात पोहचले नव्हते. तसेच लेखा विभागातील दोन कर्मचारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, दोन लिपीकांना पहिल्याच दिवशी लेटमार्क मिळाला. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी सांगितले.
वणी तहसील कार्यालयातील १२ कर्मचाऱ्यांना नोटीस
दोन दिवसांच्या सलग सुट्या उपभोगल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी वणी तहसील कार्यालयात उशिरा पोहचणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना तहसीलदार श्याम धनमने यांनी नोटीस बजावली. यात चार अव्वल कारकून व आठ कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे. येथील तहसील कार्यालया १० अव्वल कारकून व १६ कनिष्ठ लिपीक आहेत.