मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

By Admin | Updated: April 27, 2017 00:32 IST2017-04-27T00:32:17+5:302017-04-27T00:32:17+5:30

रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून

Haldhakka and Rack Point Undersea | मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

मालधक्का व रॅक पॉर्इंट अधांतरीच

 नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात : मंत्र्यांचे आश्वासनही हवेत विरले
वणी : रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास बाधा आणणारा दगडी कोळशाचा मालधक्का स्टेशन परिसरातून हटविण्यासाठी नागरिक सातत्याने मागणी करीत आहे. तसेच रेल्वेच्या कायर रेल्वे स्टेशनवर रासायनीक खताचा रॅक पॉर्इंट देण्याची मागणीही कृषी साहित्य विक्रेता व शेतकरी करीत आहे. मात्र या दोन्ही समस्या सुटण्याचा कोणताही संकेत दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
वणीचे रेल्वे स्टेशन मानवी वस्तीला लागून आहे. या रेल्वे स्टेशनवरून चार रेल्वे गाड्या धावतात. मात्र या स्टेशनवरून प्रवासासाठी येणारा-जाणारा प्रवासही स्टेशनच्या दैनावस्थेकडे पाहून हे रेल्वे स्टेशन आहे, की कोळाचे आगार असा प्रश्न विचारतात.
वणी परिसरात दगडी कोळशाच्या डझनभर खाणी आहेत. या खाणीतून निघणारा कोळसा दररोज रेल्वेने वीज निर्मिती केंद्राना व इतर उद्योगांना पाठविला जातो. खाणीतील कोळसा ट्रकद्वारे रेल्वे स्टेशनजवळ आणून रिचविला जातो. स्टेशनलगतच कोळशाचा मालधक्का बनविण्यात आला आहे. त्यामुळे स्टेशन लगतच कोळशाचे ढिगारे दिसून येतात.
या ठिकाणी कोळसा जेसीबीद्वारे रेल्वे वॅगनमध्ये भरला जातो. कोळसा भरताना उडलेली कोळशाची भूकटी परिसरात पसरते. त्यामुळे स्टेशनसह परिसर काळवंडून जातात. स्टेशनवर बसायला स्वच्छ जागा नाही. त्यामुळे नागरिकांना श्वास घेतानाही त्रास होतो. घराच्या छतावर वाळायला टाकलेले कपडे वाळेपर्यंत काळे डाग पडून घाणेरडे होतात.
दिवसभर चालणारी जेसीबीची घरघर तर नागरिकांच्या कानठिण्या बसवून टाकत आहे. त्यामुळे मालधक्का येथून हटवावा, अशी मागणी होत आहे. या मागणीवरून केंद्रीय राज्यमंत्री यांनी हा मालधक्का लवकरच येथून हटवणार, असे अश्वासन सतत चार-पाच वर्षापासून देत आहे. मात्र आश्वासनाची पूर्तता अजूनही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तसेच कायर स्टेशनवर रासायनीक खताची रॅक पॉर्इंटही मंजुर झाल्याचे नागरिक व शेतकरी तीन वर्षापासून अहीर यांच्या तोंडून ऐकत आहे. मात्र त्याचीही पूर्तता अजून झाली नाही. मागील वर्षी पिंपळखुटी स्टेशनवर एक रॅक उतरली. मात्र कायर वणीच्या जवळ असूनही कायर स्टेशनला न्याय मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिक दराने खत विकत घ्यावे लागत आहे. वरील दोन्ही समस्या अहीर साहेब केव्हा सोडविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Haldhakka and Rack Point Undersea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.