गारपीटग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित
By Admin | Updated: August 29, 2015 02:41 IST2015-08-29T02:41:10+5:302015-08-29T02:41:10+5:30
फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे.

गारपीटग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित
केवळ येरझारा : अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष
दारव्हा : फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे.
त्यावेळी झालेल्या नुकसानानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वे करून अहवाल दिला होता. त्या अहवालात पिकाचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे दाखविल्यानंतरही अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारी २०१४ ला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे देऊळगाव येथील शेतकरी अंकुश दत्ताप्य लाभसेटवार यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटीमुळे लाभसेटवार यांच्या शेतातील चन्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु वर्षभरानंतरही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
या गारपिटीनंतर झालेल्या संयुक्त सर्वेत लाभसेटवार यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीनिशी तसा अहवालसुद्धा प्रशासनाला देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष मदतीच्या यादीत मात्र लाभसेटवार यांच्यासह काही शेतकऱ्याचे नाव नव्हते.
त्यामुळे कृषी व महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या लोकशाही दिनात तक्रार केली तेव्हा १६ जून २०१५ ला त्यांना त्यांच्या शेतात हरभरा पिकाचा पेरा नसल्याने ते मोबदल्यास पात्र ठरत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: कोलमडला असल्याचे दिसून येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची अंकुश लाभसेटवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, चौकशी करून मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)