वाघासोबत गुराख्याची निकराची झुंज
By Admin | Updated: November 9, 2016 00:22 IST2016-11-09T00:22:24+5:302016-11-09T00:22:24+5:30
जंगलात गाई घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला अचानक हल्ला केला.

वाघासोबत गुराख्याची निकराची झुंज
गंभीर जखमी : घोडदरा जंगलातील थरार, कळपातील गाय मात्र ठार
पांढरकवडा/उमरी : जंगलात गाई घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला अचानक हल्ला केला. जीवाच्या आकांताने सोबत असलेल्या एका काठीने वाघासोबत निकराची झुंज दिली. वाघाने नमते घेत आल्या पावली परत गेला. मात्र या झुंजीत गुराख्याचा एक हात गंभीर जखमी झाला. हा थरार पांढरकवडा तालुक्यातील घोडदरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. मात्र वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुळशीराम तानबा वाघाडे (४५) रा. घोडदरा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे आपली जनावरे घेऊन घोडदरालगतच्या जंगलात चारण्यासाठी गेला होता. कंपार्टमेंट नं.७९ मध्ये एका वाघाने अचानक गाईच्या कळपावर हल्ला केला. आपला बचाव करण्यासाठी गुराखी तुळशीराम प्रयत्न करीत असतानाच वाघाने त्याच्यावरही हल्ला केला.आता आपले काही खरे नाही असा विचार त्याच्या मनात आला. मात्र जीव वाचविण्यासाठी त्याने आपल्या जवळील काठीने निकराचा प्रयत्न केला. काही वेळ वाघ आणि गुराखी यांच्यात घमासान सुरू होती. शेवटी वाघानेच नमते घेत तेथून काढता पाय घेतला. मात्र यात तुळशीरामच्या उजव्या हाताला वाघाने गंभीर जखमी केले. तर वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाली. यानंतर हा प्रकार गावात माहीत होताच गावकऱ्यांनी तुळशीरामला तत्काळ उमरी येथील मिशनरी रुग्णालयात दाखल केले. उमरीचे सरपंच वसंत राठोड यांच्यासह वनरक्षक आंबेकर, पवार यांनी तातडीने जखमीची भेट घेतली.
पांढरकवडा तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला असून अनेक जनावरे ठार मारली आहे. आठ दिवसापूर्वी एका वाघाने पांढरकवडा तालुक्यात उमरी-रुंझा रस्त्यावर वाहतूक रोखली होती. या नरभक्षक वाघाची परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)