गुलाब शेतीतून दरवळतो श्रमाचा सुगंध
By Admin | Updated: January 31, 2015 00:11 IST2015-01-31T00:11:53+5:302015-01-31T00:11:53+5:30
शेती कसणे म्हणजे पुरुषांचे काम अशी काहीशी धारणा. निसर्गाच्या लहरीपणापुढे अनेकांनी हात टेकले. कर्जबाजारीपणातून शेतकरी विषाचा घोट घेत आहे.

गुलाब शेतीतून दरवळतो श्रमाचा सुगंध
महागाव : शेती कसणे म्हणजे पुरुषांचे काम अशी काहीशी धारणा. निसर्गाच्या लहरीपणापुढे अनेकांनी हात टेकले. कर्जबाजारीपणातून शेतकरी विषाचा घोट घेत आहे. अशा विपरित परिस्थितीत एक महिला शेती कसते. परंपरागत शेतीला फाटा देत एक एकरात गुलाबाची लागवड करते. तिच्या श्रमातून फुललेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात दरवळतो. ही महिला शेतकरी आहे, महागाव तालुक्यातील सवना येथील लक्ष्मीबाई बंडू पारवेकर.
शेतकऱ्यांची पत आणि शेतीची पोत कमी होत आहे. त्यातच निसर्गाचा माराही सहन करावा लागतो. परंपरागत शेतीने अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. काहींनी जीवन यात्रा संपविली. यवतमाळ जिल्हा तर शेतकरी आत्महत्यांनी कुप्रसिद्ध झाला. अशा एका यवतमाळ जिल्ह्यातील दहावीपर्यंत शिक्षण झालेली लक्ष्मीबाई पदर खोचून आपल्या परंपरागत चार एकर शेतीत उतरते. कापूस, सोयाबीन पिकातून काहीच उरत नाही हे तिच्या लक्षात येते. काय करावे अशा विचारात असतानाच त्यांनी गुलाब शेतीचा निर्णय घेतला. २००४ साली पुणे येथून गुलाबाच्या शंभर कलमा विकत आणल्या. विविध जातीचे गुलाब त्यांनी आपल्या शेतात लावले. पांढरा, पिवळा, केशरी रंगांचे गुलाब त्यांच्या शेतात बहरु लागले. परंतु या कलमांमध्ये त्यांना मोठी तफावत आढळून आली. अशातच काही जातीची गुलाब फुले टिकावू आणि वाहून नेण्यासाठी सोपी असतात हे लक्षात आले. १०० कलमांवरून त्यांनी आपल्या शेतात गुलाबाच्या २२०० कलमा लावल्या. जमिनीचा पोत आणि गादी वाफ्याचा वापर करून गुलाबाच्या कलमाची लागवड केली. एका झाडाला किमान दररोज अडीच लिटर पाणी लागते. नत्र, स्फुरद, सूक्ष्न अन्न द्रव्य पिकाला दिले जाते. बुरशी, अळी आदींपासून बचाव करण्यासाठी लक्ष्मीबाईने आपल्या श्रमातून गुलाबाची शेती फुलविली आता त्यांच्या शेतात रंगीबेरंगी गुलाब पुष्प उमलत आहे.
मागणीनुसार नांदेड, नागपूर, पुसद आदी ठिकाणी फुलांची विक्री केली जाते. किमान १६०० रुपयांची फुले दररोज बाजारात विकली जातात. कधी काळी कर्जाचा डोंगर असलेल्या लक्ष्मीबाईच्या हातात आता पैसा खुळखुळायला लागला. या फुल शेतीच्या भरोश्यावरच लक्ष्मीबाई दोन मुले पुणे येथे शिक्षण घेत आहे. (शहर प्रतिनिधी)