शाळांमध्ये आता ‘गेस्ट टिचर’
By Admin | Updated: October 10, 2015 01:53 IST2015-10-10T01:53:01+5:302015-10-10T01:53:01+5:30
महाविद्यालयांमध्ये अनुभवी मंडळींना ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावण्याची पद्धती प्रचलित आहे.

शाळांमध्ये आता ‘गेस्ट टिचर’
गावपातळीवर पॅनल : जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये नेमणूक
अविनाश साबापुरे यवतमाळ
महाविद्यालयांमध्ये अनुभवी मंडळींना ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून बोलावण्याची पद्धती प्रचलित आहे. हीच पद्धती आता जिल्ह्यातील ४५ उच्च प्राथमिक शाळांमध्येही सुरू करण्यात येणार आहे. बौद्धिक विकासासोबतच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा भावनिक, सामाजिक कलानेही विस्तार व्हावा, यासाठी ‘अतिथी निदेशक’ नेमण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी दिली.
सक्ती व मोफत शिक्षणाच्या अधिनियमानुसार विद्यार्थ्यांचा बुद्धांक वाढविण्याबरोबरच त्यांचा भावनांकही वाढविण्याची गरज आहे. गणित-भाषा, विज्ञान या विषयांच्या अभ्यासक्रमांतून बुद्धांक वाढण्यास मदत होते. मात्र, विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होण्यासाठी काही विशेष विषयांची गरज असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यासाठी कला, क्रीडा व आरोग्य, कार्यानुभव या विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे. यातील काही विषय शाळांच्या वेळापत्रकात यापूर्वीपासूनच समाविष्ट आहेत. अंशकालीन निदेशकांचीही त्या दृष्टीने नेमणूक करण्यात आली होती. मात्र, तेच ते शिक्षक ठराविक पद्धतीने हे विषय शिकवत असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासालाही मर्यादा पडते. ही बाब लक्षात घेऊन आता शिक्षण विभागाने अतिथी निदेशकांचे एक पॅनलच तयार करण्याचे ठरविले.
प्राथमिक शाळांसाठी अतिथी निदेशकांचे पथक नेमण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे राहणार आहे. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा या पॅनलमध्ये समावेश होणे अपेक्षित आहे.