पालकमंत्र्यांनी तपासला अन्नाचा दर्जा
By Admin | Updated: October 8, 2015 02:15 IST2015-10-08T02:15:33+5:302015-10-08T02:15:33+5:30
पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी सायंकाळी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘किचन’ला अचानक भेट दिली.

पालकमंत्र्यांनी तपासला अन्नाचा दर्जा
स्वत: घेतले भोजन : ‘मेडिकल’च्या किचनची केली तपासणी
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी सायंकाळी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘किचन’ला अचानक भेट दिली. रुग्णांसाठी शिजणाऱ्या अन्नाचा दर्जा स्वत: भोजन करून तपासला.
किचनमध्ये कर्मचारी रुग्णांसाठी डाळभाजी, चपाती, भात आदी अन्न शिजवित होते. ते कशा पद्धतीने शिजविले जाते, किचनची स्वच्छता, किराणा, पाण्याची व्यवस्था, अन्न पदार्थांचा दर्जा आदी बाबींची ना. राठोड यांनी पाहणी केली. त्यांनी तयार झालेल्या पदार्थांची चव घेऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा उपस्थित मदतनिसांनी चपाती, डाळभाजी, भात, लोणचे आदी पदार्थ असलेले ताट त्यांना करून दिले. यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जात तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगितले. शिवाय अन्नाची तपासणी नियमित करण्याचे निर्देश त्यांनी अधिष्ठातांना दिले.
वैद्यकीय महाविद्यालय परिसरात गेल्या आठवड्यात एका शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीशी झालेल्या प्रकाराची दखल घेऊन त्यांनी या परिसरात सुरक्षा वाढविण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांची पूर्णवेळ गस्त सुरू करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या होत्या. ही गस्त सुरू झाली की नाही याचा आढावाही त्यांनी घेतला. तसेच मेडिकल परिसरात लाईट्स लावण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले. परिसरात वाढलेली झुडपं तत्काळ काढून स्वच्छता करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. सुरक्षेच्यादृष्टीने वैद्यकीय महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार एकाच ठिकाणी असावे, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचविले. यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी चेतन जनबांधे, बाळू चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता होतवाणी, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, विकास क्षीरसागर, राजू गिरी आदी होते. (वार्ताहर)