तंबाखूमुक्तीसाठी आठवडाभर शाळांची झाडाझडती
By Admin | Updated: February 29, 2016 02:07 IST2016-02-29T02:07:35+5:302016-02-29T02:07:35+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

तंबाखूमुक्तीसाठी आठवडाभर शाळांची झाडाझडती
जिल्ह्यात ‘प्रेरणा अभियान’ : विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी शाळांमध्ये जाऊन करणार तपासणी
यवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या ३१ डिसेंबर रोजी प्रत्येक शाळेत तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. आता या शपथेची किती अमलबजावणी होत आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. २ ते १० मार्च यादरम्यान विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून प्रत्येक शाळेची झाडाझडतीच घेतली जाणार आहे.
शाळा तंबाखूमुक्त असाव्यात, विद्यार्थी, शिक्षक तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने मागील दोन वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रप्रमुख, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन या विषयाची माहिती जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचलेली आहे. यावर्षी शाळांची तपासणी करण्यात येणार असून या शाळा तपासणी कार्यक्रमाला ‘प्रेरणा अभियान’ म्हणून संबोधण्यात येणार आहे.
प्रेरणा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्वच प्राथमिक २ हजार १०९ शाळा, तसेच खासगी व जिल्हा परिषद माध्यमिकच्या प्रस्तावित शाळांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात ‘प्रेरणा अभियान’ २९ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात २९ फेब्रुवारीला जिल्ह्यातील शाळा तपासणीसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व तालुका समन्वयक यांची कार्यशाळा जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. १ मार्चला गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख, तालुका समन्वयक व शाळा तपासणी स्वयंसेवक यांची सभा होणार आहे. २ मार्च ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच शाळांची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे.
तंबाखूमुक्त शाळांची ११ निकषांचे आधारे तपासणी होणार असून तपासणीदरम्यान शाळांना आवश्यकता भासल्यास मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांचा सहभाग घेऊन १०० टक्के शाळांची तपासणी करणारा देशातील यवतमाळ हा एकमेव जिल्हा असून या कार्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन, लायन्स क्लब यवतमाळ जिल्हा, रोटरी क्लब यवतमाळ जिल्हा, रेड क्रॉस सोसायटी, जायंट इंटरनॅशनल, जमात-ए-इस्लामी, भारतीय जैन संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, प्रयास यवतमाळ इत्यादी विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभत आहे.
यवतमाळ जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रेरणा अभियाना’स जिल्ह्यातील सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे, अवधूत वानखेडे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
देशात एकमेव जिल्हा
जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूपासून मुक्त व्हाव्या यासाठी धडपडणार यवतमाळ हा देशातील एकमेव जिल्हा आहे. तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी शाळांची प्रत्यक्ष तपासणी आजवर कोणत्याही जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे ‘प्रेरणा अभियाना’कडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.