‘कृृषी’च्याच शेतात गवत

By Admin | Updated: November 22, 2014 23:10 IST2014-11-22T23:10:18+5:302014-11-22T23:10:18+5:30

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.

Grass in the fields of 'Krishshi' | ‘कृृषी’च्याच शेतात गवत

‘कृृषी’च्याच शेतात गवत

रमेश झिंगरे - बोटोणी
कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.
वणी तालुक्यातील निंबाळा येथे सन १९६० पासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या पांढरकवडा उपविभागांतर्गत कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. ही शेती डॉ.नुरजहा बेगम यांची होती. ती सिलींग कायद्याने शासनाने अधिगृहीत केल्याचे जाणकार सांगतात. या केंद्रात कृषी प्रशिक्षण केंद्राची तब्बल ७० एकर शेती आहे. त्यापैकी ४० एकर शेती वहितीत आहे. मात्र ही शेती सांभाळण्यासाठी येथील पर्यवेक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शासन कृषी विकासाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखते. परंतु निंबाळा येथील सिंचनाअभावी कृषी चिकित्सालय अखेरच्या घटका मोजत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करून तेथे ४० एकरात २५ बॅगा सोयाबीन, तुरीची ट्रॅक्टरनेच पेरणी करण्यात आली. शेजारच्या शेतातील पीकात डवरणी सुरू होती, त्यावेळी या शेतात पेरणी सुरू होती. पूर्वी बैलजोड्या होत्या. आता डवरणी, वखरणी करण्यासाठी भाड्याने औत सांगावे लागते. यावर्षी औताने डवरणी करण्यात आली नाही. निंदन, खुरपणही करण्यात आले नाही. परिणामी ४० एकरात सोयाबीन कुठेच दिसत नसून सगळीकडे गवताचेच साम्राज्य आहे.
सोयाबीन गवताने झाकले गेले आहे. सोयाबिनखाली तर गवत वर दिसत आहे. केवळ तुरी उंच वाढत असल्याने गवताच्यावर दिसत आहे. पूर्वी या शेतात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जात होती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता केवळ सोयाबीन व तुरीचेच पीक घेतले जाते. लागवडी एवढेच उत्पन्न निघते. अनुदानाच्या विलंबामुळे पेरणी उशीरा होते. शिवारात डवरणी, फवारणी सुरू असताना या केंद्रात पेरणी सुरू असते. परिणामी उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
शेतकऱ्यांना बियाणे व शेतीबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात तालुका बिज गुण प्रक्षेत्रअंतर्गत गांडूळ खत व गांडूळ कल्चर उत्पादन केले जाते. वणी-मारेगाव या राज्य मार्गावर असलेल्या या शेतीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र प्रत्यक्षात शेतीची पार दुर्दशा झाली आहे. तेथे पिकाऐवजी गवतच दिसून येते. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Grass in the fields of 'Krishshi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.